काँग्रेस नेत्याने जरांगे पाटलांना फटकारले; सरकारलाही दिला इशारा

नागपूर : राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाचा वाद सुरू आहे. आरक्षण मिळावं म्हणून जालन्यात उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलक या उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा 12 वा दिवस आहे. आरक्षणासाठी आजही मराठा समाज रस्त्यावर उतरला. अनेक ठिकणी निदर्शने आणि आंदोलने सुरूच आहेत. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे आल्याने ओबीसी नेते आक्रमक झाले असून त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. जरांगे पाटील यांनी म्हणावं आणि सर्वच मान्य करावं असं काही नाही. कायद्यानुसार, चौकटीत बसत असले तर त्यांना आरक्षण द्यायला हरकत नाही. जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण द्या म्हटलं तर ओबीसी समाज ते मान्य करणार नाही, जरांगे पाटील म्हणणार तसंच होणार नाही, असा इशाराच विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे पाटील यांची मागणी संवैधानीक नाही. असं प्रमाणपत्र देता येत नाही. वंशावळीत राज्य सरकारने काही गडबड केली तर आम्ही विरोध करू. सरकारला आंदोलन संपवायचं असेल तर ते सरकारने ठरवावं. ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण लावू नका. आपली पोळी शेकू नका. जातीनुसार जनगणना करा आणि आरक्षण द्या, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं.

विरोधीपक्ष नेता म्हणून मी जरांगे पाटील यांना भेटलो, उपोषण सोडावं असं त्यांना सांगितलं. ओबीसींच्या 27 टक्क्यात तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. तुम्हाला आरक्षण हवं असेल तर ते वाढवून घ्या. त्यासाठी टक्का वाढवा. तुम्हाला स्वतंत्र आरक्षण घ्या. आमची काहीच हरकत नाही, असं जरांगे पाटील यांना सांगितल्याचंही ते म्हणाले.