स्वराज्यरक्षक का धर्मवीर? छत्रपती संभाजी महाराजांबाबत अजित पवारांमुळे निर्माण झालायं हा वाद

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत केलेल्या एका विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार म्हणाले. ‘बाल शौर्य पुरस्कार’ हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावरून भाजप नेते आणि शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी दिले प्रतिउत्तर

छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले. धर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचे रक्षण केले. त्यांना औरंगजेबाने का मारले? संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले, पण त्यांनी मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी हालअपेष्टा होऊन त्यांचे बलिदान झाले. त्यांच्या शरिराचे अक्षरशः तुकडे केले. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा सोडली नाही. म्हणून अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीरही होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी

भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. असे बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना कुणी दिला? अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, असे तुषार भोसले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते आणि सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई यांनीही अजित पवारांच्या या विधानाचा समाचार घेतला असून, अजित पवारांचे वक्तव्य लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशापद्धतीचे आहे. याची निंदा करावी तेवढी थोडी आहे. दादांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर म्हणून नका असे सांगणे निषेधार्ह आहे. महाराष्ट्रामध्ये या वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल. आपण बोललो हे चुकीचे आहे हे अजित पवारांच्या लक्षात येईल. छत्रपती संभाजी महाराज हे कालही धर्मवीर, धर्मरक्षक होते आजही आहेत आणि इतिहासाच्या अखेरीपर्यंत ते धर्मवीर धर्मरक्षकच राहतील, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.