चांद्रयान 3 चा खर्च 615 कोटी, कमाई मात्र 31 हजार कोटींची; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाने संपूर्ण जग थक्क झाले आहे. इस्त्रो 615 कोटी रुपयांत तयार केलेले चंद्रयान-3 (Chandrayaan-3) चांद्राच्या पृष्ठभागावर उतरवून जगाला चकित केले आहे. मात्र, भारताच्या यशाने एअरोस्पेसशी संबंधित देशांतर्गत कंपन्यांची चांदी केली आहे. याच आठवड्यात चार व्यवहाराच्या दिवसांत स्पेसशी संबंधित 13 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये तब्बल 31 हजार कोटी रुपयांची तेजी आली आहे.

चांद्रयान-3 साठी ISRO ला प्रमुख मॉड्यूल्स आणि सिस्टम पुरवणाऱ्या सेंटम इलेक्ट्रॉनिक्सच्या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये या आठवड्यात 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आठवड्यात अवांटेल, लिंडे इंडिया, पारस डिफेन्स आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या शेअर्समध्येही दुहेरी अंकी वाढ झाली. गोदरेज इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. लार्सन अँड टुब्रो (L&T) चंद्र मोहिमेमध्ये प्रणालीच्या निर्मितीपासून ते मिशन ट्रॅकिंगपर्यंत सामील होते. पारसने चांद्रयान-3 साठी नेव्हिगेशन सिस्टीमचा पुरवठा केला तर PSU BHEL ने टायटॅनियम टँक आणि बॅटरीचा पुरवठा केला.

चंद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण जगातील स्पेस इंडस्ट्रीजचे लक्ष भारताकडे आकर्षित झाले आहे. सध्या ग्लोबल स्पेस मार्केट हे 447 अब्ज डॉलरचे आहे. मात्र यात भारताचा वाटा फार कमी आहे. चंद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर, अनेक देशांनी अंतराळ क्षेत्रात भागिदारीसाठी भारतासोबत संपर्क साधला आहे. यात सौदी अरेबिया, सिंगापूर आणि साऊथ कोरियाचा समावेश आहे.