तरुण भारत लाईव्ह न्युज भुसावळ : शहरातील वसंत टॉकीज जवळील गायत्री पान सेंटरमध्ये प्रतिबंधीत गुटख्यासह हुक्का पार्लरच्या साहित्याची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी तीन ठिकाणे छापेमारी करीत चार लाख 51 हजार 824 रुपयांचा राज्यात प्रतिबंधीत गुटखा व विदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्याने शहरातील गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्यानंतर रविवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, शहरातील एका पानटपरीवर कारवाई करण्याचे धाडस यंत्रणेने दाखवल्यानंतर शहरातील इतर गुटखा माफियांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील पानटपर्यांसह किराणा दुकानांवर खुलेआम विक्री होणार्या गुटख्यावर प्रतिबंध लावण्यासह शहरातील मोठ्या गुटखा माफियावर पोलिस यंत्रणा कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का? असा प्रश्न या निमित्ताने सुज्ञ शहरवासी उपस्थित करीत आहेत.
एलसीबीच्या कारवाईने खळबळ
शहरातील वसंत टॉकीजजवळ असलेल्या गायत्री पान सेंटरवर गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती एलसीबी पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाल्याने त्यांनी पथकाला खातरजमा करण्यासाठी पाठवल्यानंतर गुटखा उपलब्ध झाल्याने पोलिसांच्या दोन पथकांनी प्रदीप व प्रकाश यांना ताब्यात घेत गायत्री पानसेंटरसह त्यांच्या प्रभाकर कॉलनीतील घरातून चार लाख 30 हजार 475 रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा तसेच जळगाव रोडवरील पियुष प्रदीप जोशी यांच्या पानटपरीवजा दुकानातून 21 हजार 349 रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा व हुक्का पार्लरचे साहित्य जप्त केले.
साडेचार लाख रुपयांचा साठा जप्त
गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही पानटपरींसह संशयितांच्या घरातून राजश्री पानमसाला, सिग्नेचर पानमसाला, बाबानवरतन पानमसाला, रजनीगंधा पानमसाला, पानपराग पानमसाला, विमल पानमसाला, बाबा तंबाखू, आरएमडी, रजनीगंधा, जाफरानी जर्दा, क्लासीक रेड सिगारेट, विल्स डिलक्स नेव्ही कट, गुड गरम, ब्लॅक सिगारेट असा एकूण चार लाख 51 हजार 824 रुपयांचा साठा जप्त केला. भुसावळ शहर पोलिसात या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा जळगाव गुन्हे शाखेचे नाईक किशोर ममराज राठोड यांच्या फिर्यादीवरून संशयित पियुष प्रदीप जोशी (24, प्रभाकर कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात तसेच नाईक रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून प्रकाश परमानंद जोशी (52) व प्रदीप परमानंद जोशी (47, दोन्ही रा.प्रभाकर कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांना रविवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास पोलिस उपनिरीक्षक संजय कंखरे व उपनिरीक्षक दिलीप चौधरी करीत आहेत.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधीन उपअधीक्षक सतीश संजयराव कुलकर्णी व आप्पासाो.बबन पवार, उपनिरीक्षक गणेश वाघमारे तसेच सहायक फौजदार युनूस शेख, हवालदार सुनील दामोदरे, दीपक पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, चालक प्रमोद ठाकूर, चालक अमोल करडईकर तसेच बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, अन्वर शेख, महेश चौधरी, सचिन पोळ, सागर वंजारी, संगीता सावळे आदींच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक दिलीप चौधरी व उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.
गुटखा किंग मात्र मोकाट
शहरातील पानटपरीवर कारवाई झाल्यानंतर पोलिसांना साडेचार लाखांचा गुटखा मिळाला मात्र बड्या गुटखा माफियावर कारवाई करण्याचे धाडस पोलिस यंत्रणा दाखवणार का ? असा प्रश्न शहरातील सुज्ञ नागरीक पोलिसांना विचारत आहे. शहरातील एक मोठा गुटखा किंग शहरातील छोट्या दुकानदारांना गुटख्याचा यंत्रणेच्या छुप्या सहकार्याने पुरवठा करीत असताना यंत्रणेने डोळ्यावर पट्टी का बांधली आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जळगाव गुन्हे शाखा भुसावळात येवून कारवाई करते मग स्थानिक पोलिसांना ही बाब कळत कशी नाही? पाणी नेमके कुठे मुरतेय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.