यावल : किनगाव येथील वृध्दाच्या खून प्रकरणाचा चोवीस तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सुनेनेच प्रियकराच्या मदतीने सासऱ्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने शनिवारी दोघांना अटक केली आहे. जावेद शाह अली शाह फकीर (३२, , प्रतिभा नगर, वरणगाव, ह.मु.उदळी, ता.रावेर) व मिनाबाई विनोद सोनवणे (३०, किनगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यावल तालुक्यातील किनगाव येथील भीमराव सपकाळे (५८) यांचा शुक्रवारी किनगाव चुंचाळे रस्त्यावरील नाल्याचे पुलाखाली मृतदेह आढळून आला होता. त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आलेली होती. याबाबत खुन झालेल्या व्यक्तिच्या मुलाने यावल पोलीस ठाण्यात खून झाल्याची फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असताना मयत इसमाच्या सुनेने तिच्या प्रियकरच्या मदतीने सदर कृत्य केल्याचे उघड झाले.
अनैतिक संबंधाला विरोध केल्याने केला खून
उदळी, ता. रावेर येथील जावेद शाह अली शाह फकीर या तरुणाने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीनुसार किनगाव ता. यावल येथील भीमराव सपकाळे (५८) यांची सून मीना विनोद सोनवणे हिच्या बहीणीचे उदळी येथे सासर आहे व मीना हिची विवाहपुर्वी उदळीला जायची तेथे तिची ओळख जावेद शहा अली शाह फकीर सोबत झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये जवळीक झाली होती तेव्हा विवाहनंतर जावेद शाह हा किनगाव येथे येऊ – जाऊ लागला होता. दरम्यान त्याचं येणं जाणं हे भीमराव सोनवणे यांना आवडत नव्हतं त्यातच जावेद शहा हा गुरुवारी देखील दुपारी आला व त्याने आपल्या दुचाकी वर भीमराव सपकाळे यांना घेऊन यावल व गावात फिरला सोबत दारू पिला आणि रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चुंचाळे जवळील पुलावर येऊन त्याचं भांडण भीमराव सोनवणे यांच्यासोबत झालं आणि तेथेच त्यांनी चाकूने वार करून त्यांची हत्या केली असे त्याने पोलिसांना जबाब सांगितले.
भुसावळच्या रिदम हॉस्पिटल जवळून केली अटक
टेक्निकल व विवाहितेच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती घेऊन पोलिसांचा आरोपीवर संशय बळावला व त्यानंतर त्याच्या शोध घेत असताना तो भुसावळ येथील रिदम हॉस्पिटल जवळ मिळून आला व तिथून त्याला अटक केली या गुन्ह्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.