मध्यप्रदेश : धार जिल्ह्यात एक विचीत्र प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 40 वर्षीय व्यक्तीला एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तेथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. मात्र दोन वर्षांनंतर अचानक शुक्रवारी १४ रोजी हा मृत व्यक्ती जीवंत घरी परतला. यामुळे कुटुंबीयांचा आनंद द्विगुण झाला.
नेमकी घटना काय?
कमलेश या व्यक्तीला २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना बडोदा येथील खासगी रुग्णालयात कोरोना उपचारासाठी नेण्यात आले. येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी कमलेशला मृत घोषित केले होते. रुग्णालयाची माहिती मिळताच नातेवाईक पोहोचले.
मात्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मृतदेह दुरूनच कुटुंबीयांना दाखवण्यात आला. पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या मृतदेहाची खात्रीशीर ओळख पटवणे शक्य नव्हते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने कुटुंबीयांनी त्याला कमलेश म्हणून स्वीकारले. कोरोना संक्रमीत असल्याने कोविड टीमने बडोदा येथेच त्याच्यावर अंतिम संस्कार देखील केले.
रुग्णालयाच्या रेकॉर्डनुसार मृत्यु झाल्याचं समूजन शोकसभा देखील करण्यात आली. कुटुंबाला यामुळे मोठा धक्का सहन करावा लागला. तसचे मृत्यु झाला असे समजून सदर व्यक्तीची पत्नीही दोन वर्षांपासून विधवेचे जीवन जगत होती. पण कमलेश जिवंत घरी परतल्याने कुटुंबियांचे आनंद द्विगुण झाले.
दरम्यान, कमलेशने सांगितले की, कोरोनातून बरे झाल्यावर तो एका टोळीच्या तावडीत सापडल्याची माहिती दिली. त्याने सांगितले की अहमदाबादमध्ये पाच ते सात तरुणांनी त्याला ओलिस ठेवले होते आणि एक दिवस आड त्याला ड्रग्सचे इंजेक्शन दिले होते. ज्यामुळे तो सर्व वेळ बेशुद्ध होता. शुक्रवारी त्यांलाअहमदाबादहून चारचाकी वाहनातून दुसऱ्या ठिकाणी नेले जात होते. दरम्यान, टोळीचे सदस्य एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले. दरम्यान, अहमदाबादहून इंदूरकडे प्रवासी बस येत असल्याचे पाहून तो चारचाकीतून खाली उतरून बसमध्ये बसला. रात्री उशिरा सरदारपूर येथे उतरून तेथे उपस्थित लोकांना बडवेली येथे त्याच्या मामाच्या घरी पोहोचण्यास सांगितले. त्यानंतर लोकांच्या मदतीने तो बारवेलीला पोहोचल्याचे सांगितले.