भरघोस नफ्याच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरातील पवन बळीराम सोनवणे (वय २५, रा. देविदास कॉलनी) या तरूणाशी सायबर ठगाने टेलिग्राम साईटवरुन संपर्क वाढत क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणूक करुन जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून १५ लाख ३५ हजार रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

पवन हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. १२ एप्रिल रोजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन पवनला जॉब विषयक मॅसेज आला. त्यावर रिप्लाय केला असता पवनला युट्युब लिंक पाठवल्या. या लिंकवरुन नंतर टेलिग्राम युझर आयडी देण्यात आला. पवनचा विश्वास संपादनासाठी ठगाने दोन हजार रुपये बोनस पवनच्या बँक खात्यात जमा केला.

यानंतर क्रिप्टो करंन्सीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा प्राप्त करुन देतो, असे आमिष तसेच खोटे आश्वासन संबंधितांनी पवन यास दिले. या बदल्यात पवन याच्याकडून ठगाने २२ एप्रिलपर्यंत वेळोवेळी १५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन स्विकारली. त्या मोबदल्यात कोणतीही रक्कम पवन यास परत केली नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने मंगळवारी सायबर पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर करीत आहेत.