---Advertisement---
मुक्ताईनगर : आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना १४ जुलै रोजी प्रसिद्ध केलेली आहे. प्रारूप प्रभाग रचनेच्या अधिसूचनेवर हरकती व सूचना सादर करण्यासाठी २१ जुलै पर्यंत नागरिकांना लेखी स्वरूपात सादर करावयाच्या होत्या. त्याप्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण मध्ये ११ नागरिकांनी लेखी हरकती दाखल केलेल्या होत्या. प्राप्त हरकतींवर ६ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त नाशिक येथे सुनावणी झाली होती. जिल्हाधिकारी यांच्या अभिप्रायावरून विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व हरकती नामंजूर केलेल्या असल्याचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी सांगितले.
पूर्वी मुक्ताईनगर तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट व पंचायत समितीचे आठ गण होते. आता नव्याने तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गण राहणार आहेत. यांनी दाखल केल्या होत्या लेखी स्वरूपात हरकती विशाल रामभाऊ नारखेडे व इतर, शिवाजी बाबुराव पाटील व इतर (रा. ईच्छापुर ता. मुक्ताईनगर), सूर्यकांत अभिमन्यू पाटील व इतर (रा. चारठाणा), पंढरीनाथ शालिकराव पाटील व इतर (रा. सुकळी), शितल गणेश सोनवणे (रा. निमखेडी बुद्रुक), गणेश श्रीकृष्ण पाटील व इतर (रा. इच्छापूर), आशा पांडुरंग धाटे (रा.वायला), किशोर माणिकराव पाटील (रा. महालखेडा), लक्ष्मी पद्माकर तायडे (रा. चिंचखेडा बुद्रुक) या सर्व नागरिकांनी निमखेडी बुद्रुक, उचंदा गट व गण मागील निर्मिती नुसार ठेवण्या विषयी हरकत घेतलेली होती.
बी.सी. महाजन (रा.कुऱ्हे ) यांनी कुन्हे निवडणूक विभागाची रचना चुकीची असल्याबाबत हरकत घेतली होती. प्रवीण प्रल्हाद कांडेलकर (रा. को-हाडा) यांनी कुऱ्हे रस्त्याने सलग लागून असलेली गावे नियमानुसार समाविष्ट करण्यात यावी अशा स्वरूपाची हरकत घेतलेली होती.