जळगाव : डॉक्टर आणि पेशंट यांचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे असते. परंतु कधीतरी अशी एखादी वेगळीच घटना घडते. मरणाला टेकलेला पेशंट पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहीला की डॉक्टरांना देवदूत म्हणून डोक्यावर घ्यायचे. तुमचे उपकार सात जन्मात फिटणार नाही असे डोळ्यात पाणी आणून म्हणायचे. तेच उलट घडलं. ठणठणीत पेशंट दवाखान्यात मृत्युशय्येवर गेला तर हॉस्पिटलवर दगडफेक करायची अशी आपल्यातल्या काही लोकांची मानसिकता.
आता अलिकडे काही हॉस्पिटलची डोळे फाडणारी बिले आणि औषधांचा वाढता खर्च यामुळे लोक रंजीस झालेले आहेत. त्याचा उद्रेक अधून मधून सोशल मिडियावर पहायला मिळतो. सोशल मिडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल झाली.
पोस्टकर्ते बँकेतले रिटायर्ड आहेत. गायक, वादक असे सुसंस्कृत आहेत. हॉस्पिटलचे वाढते खर्च पाहून लोकाचं भलं व्हावं या उद्देशाने त्यांनी एक पोस्ट फेसबुकवर टाकली.
पहिली पंधरा सोळा वर्षे कमवून झालं की कुठल्याही डॉक्टरांनी थोडं समाजाप्रती उदार होवून आपली तपासणी फी, ऑपरेशन फी माफक करावी. आणि शक्यतो जेनेरिक औषधे लिहून द्यावीत. काय वाटतं तुम्हाला? डॉक्टर मंडळींच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.
झालं, समाजात खदखदत असलेल्या विषयाला तोंड फुटलं
सगळ्यांच्याच आरोग्याची आणि पैशांशी जोडलेला विषय असल्यामुळे यात ही पोस्ट खूप व्हायरल झाली. अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. डॉक्टर मंडळीविषयी गोड, तिखट, आंबट अशा अनेक प्रतिक्रिया आल्या. तर काही मान्यवर डॉक्टरांनी आपली मते फेसबूक पोस्टवर नोंदविली. वैद्यकीय व्यवसायाची दुसरी बाजू म्हणजे डॉक्टरांची बाजू अतिशय तळमळीने मांडणारी ही प्रतिक्रिया अनेकांना वास्तवाची जाणीव करणारी ठरली. पोस्ट खळबळजनक ठरली. आणि दिवसभर जळगावात याच पोस्टची आणि त्यावरच्या उत्तराची चर्चा होती. काय दिले डॉक्टरांनी उत्तर ?
डॉक्टर विलास भोळे हे नामवंत डॉक्टर. आपल्या प्रतिक्रियेत ते काय म्हणतात पहा.
आपणांस एक ऑफर आहे. माझ्या मातृसेवा हॉस्पिटलचे १ ऑगस्टपासून आपण व्यवस्थापक मालक म्हणून काम बघा. मी व मॅडम आत सुरु आहे त्याप्रमाणे सेवा देवू, ओपिडी काढू व शस्त्रक्रिया करु. आम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असते तेव्हढे म्हणजे १८०००० रु वेतन प्रत्येकी तुम्ही हॉस्पिटलच्या कमाईतून द्यावेत. उर्वरित कमाईतून १५ कर्मचार्यांचे पगार, कर्जाचे हप्ते , महानगरपालिकेचे विविध कर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण व घनकचरा विल्हेवाटीचे मासिक बिल, हॉस्पिटलसाठी लागणारी औषधीचे मासिक बिल, करोडो रुपयांची १८ % टक्के जीएसटी भरुन विकत घेतलेली उपकरणांचा मेंटेनन्स पुन्हा १८% जीएसटीसहीत व याव्यतिरिक्त हॉस्पिटल चालविण्यास लागणार्या परवानगीसाठी जे १९ प्रकारचे लायसन्स लागतात त्याची वेळोवेळी द्यावी लागणारी अधिकृत फी खर्च करावी. आणि हो माझ्या मुलींची शिक्षणे व विवाह झाल्यानंतर आम्हाला मासिक पगार नाही दिला तरी चालेल. २०३० ला संन्यास घेणार आहे तेव्हा मी माझे हॉस्पिटल तुम्हाला देवून टाकेन मग ते तुम्ही माफक किंवा मोफ़त कसे चालवावे ते तुम्ही बघा.
डॉ. विलास भोळे यांच्या सडेतोड उत्तराने खळबळ माजली. पोस्टकर्त्यांना सुध्दा कल्पना नसेल आपण मांडलेला विषय एवढा उचलला जाईल. पण काही काही विचित्र आणि टोकाच्या प्रतिक्रिया आल्यानंतर पोस्टकर्त्याने पोस्ट डिलीट केली.