जळगाव : भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, अशी इंग्रजीतून सुसाईड नोट लिहित २१ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आयुष निलेश राठोड (वय २१ वर्ष, गंगाराम प्लॉट) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
भुसावळ शहरातील म्युन्सिपल हायस्कूलच्या मागे गंगाराम प्लॉट येथे आयुष हा आई , वडील, भाऊ या परिवारासह वास्तव्यास होता. आयुष हा पुणे येथे सीएस (कंपनी सेक्रेटरी) शिक्षण घेत आहे. तो नुकताच भुसावळ येथे घरी आला होता. मंगळवारी सकाळी दहा वाजले तरी आयुष हा झोपेतून उठला नाही, म्हणून त्याची आई त्याला उठविण्यासाठी गेली, आवाज दिला, मात्र त्यानंतर कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने आयुष याच्या भावाने आयुषच्या खोलीच्या खिडकीच्या काचा फोडल्या. पडदा बाजूला करुन बघितल्यावर आयुष हा छताला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हे दृश्य पाहून आयुषच्या आईसह भावाला मोठा धक्काच बसला. त्यांनी जागेवरच हंबरडा फोडला.
घटनेची माहिती मिळाल्यावर बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह रुग्णालयात हलविला. या प्रकरणी राकेश राठोड यांनी दिलेल्या माहितीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आयुषवर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.