पोलिस होण्याचे स्वप्न भंगले; १६०० मीटर धावल्यानंतर तरुणाचा मृत्यू

तरुण भारत लाईव्ह ।१८ फेब्रुवारी २०२३। वाशीम मधून एक हृदयद्रावक घटना समोर येतेय. मुंबईच्या कलिना येथे चालक पदाच्या ९९४ जागांसाठी सध्या भरती घेतली जात आहे. यावेळीच गणेश उत्तम उगले या २७ वर्षीय तरुणांचा १६०० मीटर धावल्यानंतर अचानक मृत्यू झाला आणि त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सद्या रिक्त पोलिसांची पदे भरली जात असून यासाठी हजारो तरुण जीवाची बाजी लावून प्रयत्न करत आहे. पोलीस होण्याचे स्वप्न बाळगलेल्या गणेश उत्तम उगले (वय २७) १६०० मिटर धावल्यानंतर त्याला अस्वथ वाटू लागले काही कळण्याच्या आधीच याचा दुर्देवी मृत्यू झाला.

गणेश हा खूप हुशार आणि मनमिळावू होता. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्याने बीए च शिक्षण पूर्ण करून काही दिवस पुण्यात एका खाजगी कंपनीत १५ हजार रुपये महिना इतक्या पगारावर नोकरी केली. त्या पैश्यावर घर चालवलं, लहान भावाला सैन्यात भरती केलं आणि पोलीस होण्याची जिद्द मनाशी बाळगून तो आपल्या गावी येऊन भरतीची तयारी करू लागला. शरीरातील सर्व शक्ती पणाला लावून १६०० मीटर धावला. त्यात त्याला चांगले गुणही मिळाले, आता फक्त गोळाफेक बाकी होती. १६०० मीटरचे अंतर कापून आल्यावर गणेशला अस्वस्थ वाटू लागलं आणि काही कळण्या अगोदरच त्याची प्राणजोत मालवली.

गणेशच्या पश्चात आता त्याचे आई-वडील, लहान भाऊ व सर्व गाव धाय मोकलून रडतोय. एक स्वप्न उमलण्याआधीच खुडल्याची भावना व्यक्त केली जात आहे.