जळगाव : सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने आयुष्य संपवलं आहे. राज अशोक पाटील (२१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथे ही घटना घडली. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
सैन्यदलात भरती होण्याचे उराशी स्वप्न होते. यामुळे अनेक दिवसांपासून सराव सुरु होता. मात्र, अपयश येत असल्याने तो नैराश्यग्रस्त झाला होता. दरम्यान मंगळवारी (१२ सप्टेंबर) राजने कुटुंबीयांसोबत जेवण केले. रात्री अकराच्या सुमारास तो घराच्या वरच्या मजल्यावर खोलीत झोपण्यासाठी गेला.
दरम्यान सकाळी सहाला राजचे वडील अशोक पाटील हे गुरांचे दूध काढण्यासाठी उठविण्यासाठी गेले असता, त्याने छताला असलेल्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. हा प्रकार कुटुंबीयांना समजताच त्यांनी एकच हंबरडा फोडला.
ग्रामस्थांच्या मदतीने राजचा मृतदेह शविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. सैन्यदलाच्या भरतीत अपयश आल्याने त्याने जीवन संपविल्याची चर्चा गावात होती. या प्रकरणी स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.