मुंबई : कोरोना काळानंतर राज्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती खालावली आहे. पाचवीतील साधारण ८० टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येची वजाबाकी आली नाही तर ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकाराचे गणित सोडवता आले नाही. तसेच पाचवीतील ४४ टक्के, तर आठवीतील २४ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तराचे मराठी वाचन येत नसल्याचे उघड झाले आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने देशभर ‘अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (असर) सर्वेक्षण केले. यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देशभरातील शालेय शैक्षणिक परिस्थितीचे सर्वेक्षण प्रथम फाउंडेशनच्या वतीने करण्यात येते. यामध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वयानुसार भाषा आणि गणित या विषयांतील आवश्यक क्षमता आत्मसात केल्या आहेत का, याची पाहणी यामध्ये करण्यात आली. दरवर्षी करण्यात येणार्या या सर्वेक्षणात कोरोना काळात खंड पडला होता. यापूर्वी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात पाहणी करण्यात आली. त्यानंतर यंदा (२०२२-२३) या वर्षातील शैक्षणिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. असरने महाराष्ट्रातील ३३ जिल्हे, ९८३ गावे आणि १९३९६ घरे आणि ८२३ शाळांचे सर्वेक्षण केले. तिसरीच्या वर्गातील सर्वेक्षण केलेल्या मुलांपैकी केवळ २६.६ टक्के मुले दुसरीच्या मजकूर वाचू शकतात. दुसरीमधील केवळ १८.७ टक्के मुले मूलभूत वजाबाकी करू शकतात. इयत्ता पाचवीतील केवळ ५५.५ टक्के मुले दुसरीतील मजकूर वाचू शकतात. तर इयत्ता ८ मधील केवळ ७६.१ टक्के मुले इयत्ता दुसरीच्या स्तरावरील मजकूर वाचू शकतात.
दुसरीच्या विद्यार्थ्यांना साधारण १० ते १२ साध्या सोप्या वाक्यांचा परिच्छेद वाचता येणे अपेक्षित आहे. त्यानुसार ‘एक होती आजी. एकदा तिला तिच्या बहिणीचे पत्र आले. आजीला तिने तिच्या घरी पूजेला बोलावले होते. आजीने आपल्या सामानाचे गाठोडे बांधले ’ अशा स्वरुपाचा परिच्छेद विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी देण्यात आला होता. मात्र, पाचवीच्या वर्गातील साधारण ४४ टक्के आणि आठवीतील २४ टक्के विद्यार्थी तो परिच्छेद वाचू शकले नाहीत. तर आठवीतील २.५ टक्के विद्यार्थ्यांना अक्षरेही ओळखता आली नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या सर्वेक्षणामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा म्हणजे ४१ वजा १३ करण्यास सांगण्यात आले. मात्र, अशा स्वरुपाचे गणित अवघ्या १९.६ टक्के विद्यार्थ्यांना सोडवता आले. आठवीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येस एक अंकी संख्येने भागण्यास सांगण्यात आले. म्हणजे जसे की, ५१९ भागिले ४. मात्र, अशा स्वरुपाचे गणित सोडवू शकणार्या आठवीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण फक्त ३४.६ टक्के होते.