मुंबई : बदली रद्द झाल्याने डीजेच्या तालावर मिरवणूक काढणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला महावितरणनेच शॉक दिला आहे. बेशिस्त वर्तवणूक आणि कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी महावितरणने या अधिकाऱ्याचे निलंबन केले आहे. त्यामुळे जबाबदार पदावर असलेल्या या अभियंत्याच्या असुरी आनंदाला ग्रहण लागले आहे. प्रकाश चव्हाण असे अभियंत्याचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर पोलिसांनी देखील यापूर्वीच गुन्हा दाखल केलेला आहे.
जालना येथे महावितरणच्या विभाग क्रमांक एक मधील ग्रामीण उपविभागात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंते प्रकाश चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे बदली झाली होती. मात्र, महिनाभरात त्यांची बदली पुन्हा मूळ ठिकाणी जालना येथे झाली. त्यामुळे बदलीचे आदेश हातात पडताच साहेब अभियंते आणि त्यांच्या समर्थक गुत्तेदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यामुळे त्यांनी शहरातील भर चौकात असा जल्लोष सुरु केला. विशेष म्हणजे, यासाठी डीजे लावण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ज्याप्रमाणे एखांद्या आमदार खासदाराच्या विजयाची मिरवणूक निघते, त्याप्रमाणे चव्हाण यांच्या बदलीच्या आनंदात मिरवणूक निघाली होती.
दरम्यान, सहायक अभियंते प्रकाश चव्हाण आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषपूर्ण महान कार्याची पोलिसांनी देखील तात्काळ दखल घेतली. विनापरवाना डीजे लावून भर चौकात बेकायदेशीर गर्दी जमावत मंडप लावल्या प्रकरणी प्रकाश चव्हाण यांच्यासह 20 ते 30 कार्यकर्त्यांवरती सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.