काय सांगता! लाच २४ हजार ५०० रुपयांची, अडकलं अख्खं कार्यालय ‘एसीबी’च्या जाळ्यात

bribe :  ठिबक सिंचन साहित्याच्या तक्रारदार डीलरचे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी आणि डीलरविरोधात आलेला माहितीचा अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी तसेच अनुदानप्राप्त ३५ फाईलसाठी २४ हजार ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या अख्ख्या कृषी अधिकारी कार्यालयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, लाच घेणाऱ्या अटकेतील आरोपींमध्ये तीन महत्त्वाचे वर्ग दोनचे अधिकारी असून एक कंत्राटी ऑपरेटरचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

कुठली घटना?
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयात २७ रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपी तालुका कृषी अधिकारी शिरीष रामकृष्ण घनबहादुर (४९), मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे (५७), बाळासाहेब संपतराव निकम (५७) हे तिघेही आरोपी वर्ग दोन अधिकारी असून चौथा आरोपी सागर नलावडे (२४) हा कंत्राटी ऑपरेटर म्हणून काम करतो, अशी माहिती एसीबीचे पोलिस उपअधीक्षक दिलीप साबळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. उपअधीक्षक साबळे यांनी सांगितले, की ३२ वर्षीय डीलरने कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेअंतर्गत विभागातील ३५ शेतकऱ्यांना कृषी ठिबक सिंचन साहित्य पुरविले होते. याबाबतच्या संचिका आरोपी कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे यांच्यामार्फत सादर न करता परस्पर तपासून घेतल्या होत्या.

त्यामुळे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी व तक्रारदार यांचे विरुद्ध आलेला माहिती अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी तसेच अनुदान प्राप्त ३५ फाईलसाठी प्रत्येकी सातशे रुपये फाईल याप्रमाणे २४ हजार ५०० रुपयेची लाच अधिकाऱ्यांनी मागितली होती. आरोपी अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार कंत्राटदार आरोपी सागर याने लाचेपोटी २४ हजार ५०० रुपये स्वीकारले. विशेष म्हणजे आरोपी बाळासाहेब निकम याने मुळ लाच मागणीशिवाय अधिकचे एक हजार रुपये स्टॉक रजिस्टर तपासण्यासाठी मागणी करुन ते स्विकारले. डीलरच्या तक्रारीवरुन एसीबीने शहानिशा केली असता आरोपी अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

चौघाही आरोपींना एसीबीने बेड्या ठोकल्या असून खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपाधीक्षक रुपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक तथा सापळा अधिकारी दिलीप साबळे यांनी केली. त्यांना पोलीस हवालदार भीमराज जीवडे, नाईक पाठक,अंमलदार शिंदे, बागुल यांनी सहाय्य केले.