वरिष्ठांकडून रॅगिंग, डॉक्टर विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

हैदराबाद : हैदराबादमधून एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर विद्यार्थिनीने आत्महत्या केली. डॉ. धारावती प्रीती असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, तिच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करत दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

सूत्रानुसार माहिती समोर आली असून, डॉ. धारावती प्रीतीचे पाच दिवसांपूर्वी आपला सिनियर मोहम्मद सैफ याने रॅगिंग केल्यामुळे तीने व्यथित होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी (२६ फेब्रुवारी) तिची प्राणज्योत मालवली.

प्रीती हिच्यावर सोमवारी दुपारी जनगाव जिल्ह्यातील गिरणी ठांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रीतीच्या कुटुंबीयांनी मात्र वारंगल येथील एमजीएम रुग्णालयात 21 आणि 22 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तिची ड्युटी असताना तिच्यासोबत काय घडले हे अधिकाऱ्यांनी उघड करावे अशी मागणी केली. दरम्यान,
प्रीतीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा तिचे वडील नरेंद्र यांनी केला आहे. त्यांच्या मुलीला कोणीतरी घातक इंजेक्शन दिल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. प्रीतीच्या वडिलांच्या तक्रारीवरून द्वितीय वर्षाचा विद्यार्थी मोहम्मद सैफ याला अटक करण्यात आली आहे.