शेतकरी दाम्पत्यानं उचललं टोकाचं पाऊल, घटनेनं परिसरात हळहळ

संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे. सुरेखा दळवी आणि संतोष दळवी अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सूत्रानुसार, आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून पत्नीने सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर कर्जबाजारीपणा आणि पत्नीच्या विरहातून बुधवारी पतीने देखील गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची माहिती आहे. या घटनेमुळे दोन मुले आणि दोन मुली पोरकी झाली आहेत.

महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बुधवारी सकाळी संतोष दळवी यांचा मृतदेह स्वतः च्या शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्यांना ग्रामस्थांनी तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संतोष यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनं  परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.