जळगाव : आजाराला कंटाळून शेतमजुराने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरूवार, ४ जून रोजी आसोदा येथे घडली. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रमेश काशिनाथ पाटील (वय) असे मयत शेतमजूराचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील आसोदा गावात रमेश पाटील हे आपल्या पत्नी व मुलासोबत वास्तव्याला होते. बकऱ्या चारणे व दुसऱ्यांची शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना दुर्धर आजार होता. गुरूवार, ४ जुन रोजी रात्री १२.३० वाजता ते पत्नीला बाहेर जात असल्याचे सांगून गेले.
दरम्यान घरी परतले नाही म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. पहाटे ४ वाजता विहिरीजवळील झाडाजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीत डोकावून पाहिले असता रमेश पाटील यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.