चोपडा : राज्यात बोर्डाच्या 10 वी आणि 12वी च्या परीक्षा सुरु असून या परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून अभियान राबविले जात आहे. मात्र या कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडवला जात असल्याचे दिसून आले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मुलाला कॉपी पुरवताना बापाला पोलिसांनी पकडले आणि चांगलाच चोप दिला. पोलिसांनी चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
चोपडा तालुक्यातील अडावद गावातील नूतन ज्ञानमंदिर विद्यालय या शाळेच्या आवारातील हा व्हिडीओ आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात कि एक पोलीस अधिकारी पालकाला पकडून लाठीने मारहाण करतानाचे दिसून येत आहे. यावेळी मारहाण करता करता पालक हा जमिनीवर कोसळतो त्यानंतर पोलीस अधिकारी पुन्हा लाठीने त्याला मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मुलाला कॉपी पुरवायला गेलेल्या बापाला पोलिसांकडून बेदम चोप, व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/RiF402O2X6
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) March 4, 2023
बारावीनंतर बोर्डाच्या दहावी परीक्षा देखील सुरु झाले. अडावद येथील नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या ठिकाणी दहावीचे परीक्षा केंद्र आहे. विद्यालयापासून १०० मीटरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला आपल्या मुलाला एक पालक कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करत होता.
विशेष म्हणजे पोलिसांनी पकडल्यावर पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाल्याला पोलिसांनी पोलिसांच्या काठीनेच चोप दिला आहे. उपस्थित असलेल्या नागरिकांनी याची चित्रीकरण करून मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आहे. त्यामुळे सोशल मिडियासह जळगावमध्ये जोरदार चर्चा होत आहे.