लॉस एंजिलिस : अत्यंत प्रतिष्ठित ९६ वा ‘ऑस्कर पुरस्कार सोहळा’ कॅलिफोर्नियातील लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. ऑस्कर हा ‘द अकॅडमी अवॉर्ड्स’ म्हणूनही ओळखला जातो. या सोहळ्यात अनेकांचं लक्ष ख्रिस्तोफर नोलनच्या ‘ओपनहायमर’ या चित्रपटाकडे लागून होतं. कारण या चित्रपटाला विविध विभागांत एकूण 13 नामांकनं मिळाली होती. ओपनहायमरने सर्वाधिक सात ऑस्कर पुरस्कार पटकावले आहेत.
‘टू किल अ टायगर’ या भारतीय माहितीपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म’ या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. या डॉक्युमेंट्रीची बॉबी वाइन: द पिपल्स प्रेसिडेंट, द इटर्नल मेमरी, फोर डॉटर्स, 20 डेज इन मारियुपॉल या इतरांसोबत टक्कर होती. मात्र भारताला ऑस्कर पुरस्कार मिळू शकला नाही. ट्वेंटी डेज इन मारियुपोल या डॉक्युमेंट्री फिचर फिल्मने भारताला मात दिली.
- सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ला
- सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने पटकावला आहे.
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार इमा स्टोनने ‘पुअर थिंग्स’ या चित्रपटासाठी पटकावला आहे.
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचाही ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ने आपल्या नावे केला आहे. ख्रिस्तोफर नोलनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
- ‘ओपनहायमर’ या सर्वाधिक चर्चेतल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या किलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
- सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्यासाठी बिली आयलिश आणि फिनियास ओकॉनेल यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ‘बार्बी’ या चित्रपटातील ‘व्हॉट वॉस आय मेड फॉर?’ हा गाण्यासाठी हा पुरस्कार मिळाल आहे.
- सर्वोत्कृष्ट म्युझिकचा (ओरिजिनल स्कोअर) ऑस्कर पुरस्कार लुडविग गोरानसनला ‘ओपनहायमर’ या चित्रपटासाठी मिळाला आहे.
- सर्वोत्कृष्ट साऊंडसाठी ‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. टार्न विलर्स आणि जॉनी बर्न यांनी हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
- सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार ‘द वंडरफूल स्टोरी ऑफ हेनरी शुगर’ला मिळाला आहे. वेन अँडरसन आणि स्टिव्हन रेल्स यांनी हा पुरस्कार पटकावला आहे.
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने आपल्या नावे केला आहे. होयटे वॅन होयटेमाने हा पुरस्कार स्वीकारला आहे.
- सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार ‘ट्वेंटी डेज इन मारियुपोल’ला मिळाला आहे. मॅस्टिस्लाव्ह चेरनोव्ह, मिशेल मिझनर आणि राने अरॉन्सन रथ यांनी हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. युक्रेनियन चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वांत पहिला ऑस्कर पुरस्कार आहे.
- सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्टफिल्मचा ऑस्कर पुरस्कार ‘द लास्ट रिपेअर शॉप’साठी बेन प्राऊडफुट आणि क्रिस बॉवर्स यांना मिळाला आहे.
- सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंगचा ऑस्कर पुरस्कार जेनिफर लेमने ‘ओपनहायमर’ या चित्रपटासाठी पटकावला आहे.
- सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर पुरस्कार ‘गॉडझिला मायनस वन’ या चित्रपटाने पटकावला आहे. ताकाशी यमाझाकी, कियोको शिबुया, मासाकी ताकाहाशी आणि तात्सुजी नोझिमा यांनी हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.