पेट्रोल-डिझेल विसरा, १०० टक्के इथेनॉलवर धावणारी पहिली कार

नवी दिल्ली : प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यासाठी देशात इथेनॉल इंधनावर धावणाऱ्या कार बद्दल गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. गडकरी वाहन उत्पादकांना पर्यायी इंधनावर चालणारी आणि हरित वाहने आणण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी टोयोटा मिराई ईव्ही ही हायड्रोजनवर चालणारी कार लाँच केली होती.

त्याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरी आज, मंगळवारी, २९ ऑगस्ट २०२३ रोजी टोयोटाच्या इनोव्हा कारच्या १०० टक्के इथेनॉल-इंधनयुक्त आवृत्तीचे अनावरण करणार आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी स्वःत दिली आहे. मंत्री गडकरी म्हणाले, ते आता ऑगस्ट १०० टक्के इथेनॉलवर चालणारी (टोयोटा) इनोव्हा कार देशात सादर करणार आहे.

ते म्हणाले की, २००४ मध्ये देशात पेट्रोलच्या किमती वाढल्यानंतर त्यांनी जैवइंधनामध्ये रस घेण्यास सुरुवात केली आणि यासाठी त्यांनी ब्राझीलला भेट दिली. गडकरींच्या मते, जैवइंधन आश्चर्यकारक काम करू शकते आणि पेट्रोलियम आयातीचा खर्च कमी करू शकते. बर्‍याच प्रमाणात परदेशी बचत करू शकते. सध्या ते १६ लाख कोटी रुपये आहे. हे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान आहे.