श्रीहरिकोटा : ‘एलव्हीएम ३’ या अग्निबाणाद्वारे केलेल्या ‘चंद्रयान – ३’च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे मानवाला अंतराळात नेण्याच्या भारताच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी मोहिमेलादेखील आणखी बळ मिळाले आहे. याच अग्निबाणाच्या साहाय्याने गगनयान मोहीमदेखील पूर्ण होऊ शकते, असा विश्वास असल्याने इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) गगनयान मोहिमेची पूर्वतयारी करत आहे. यासंदर्भात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ताजी माहिती दिली आहे.
२१ ऑक्टोबर रोजी मिशन गगनयानच्या पहिल्या चाचणीचे उड्डाण होणार आहे. त्यास, टेस्ट व्हीकल अबॉर्ट मिशन-1 (Test Vehicle Abort Mission -1) संबोधले जात आहे. तसेच, यास टेस्ट व्हीकल डेव्हलपमेंट फ्लाइंट (TV-D1) असेही म्हटले जाते. या लाँचिंगनुसार गगनयान मॉड्युलचे अंतराळात लाँच केले जाईल, म्हणजेच आऊटर स्पेसपर्यंत पाठवण्यात येईल. त्यानंतर, ते पुन्हा जमिनवर परतणार आहे. भारतीय नौदलाकडून त्याची रिकव्हरी करण्यात येईल. नौदलाकडून त्याची सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.
गगनयान मोहिमच्या या चाचणी उड्डाणावरच गगनयान मोहिमेची पुढील दिशी आणि योजना आखली जाणार आहे. त्यानंतर, पुढील वर्षी आणखी एक टेस्ट चाचणी होणार आहे. त्यावेळी, ह्यूमेनॉयड रोबोट व्योममित्र पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, २१ ऑक्टोबर रोजीच्या उड्डाणावेळी नेविगेशन, सिक्वेंसिंग, टेलिमेट्री, ऊर्जा इत्यादींची तपासणी केली जाणार आहे. क्रू मॉड्यूलला अबॉर्ट मिशन पूर्ण केल्यानंतर बंगालच्या खाडीत भारतीय नौदलाच्या पथकाकडूनन रिकव्हर केले जाईल. अबॉर्ट टेस्ट म्हणजे जर कुठलीही समस्या असेल तरी, एस्ट्रोनॉटसह हे मॉड्यूल सुरक्षितपणे खाली आणले जाईल.
इस्रोच्या हेवी लिफ्ट लाँचरमध्ये घन अवस्था, द्रव अवस्था आणि क्रायोजेनिक अवस्था असे तीन टप्पे असतात. गगनयान या मोहिमेत मानवासहित अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यासाठी एलव्हीएम ३ या अग्निबाणाच्या स्वरूपात काही बदल केले जाणार आहेत. या मोहिमेसाठीच्या अग्निबाणाला ह्युमन रेटेड एलव्हीएम ३ असे नाव देण्यात आले आहे.