मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला अमित शाहांच्या सासूरवाडीत ठरणार? वाचा काय आहे कनेक्शन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या (१९ फेब्रुवारी) कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोल्हापुरात असणार आहेत. यामुळे या दौर्‍यात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तार प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. मंत्रिमंडळ विस्तारच होत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शिंदे गटामध्ये उत्साह संचारला असून त्यामुळे मंत्रिमंडळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सासूरवाडी कोल्हापूर आहे हे सर्वांना माहित आहे. यामुळे जावाईबापूंच्या स्वागतासाठी कोल्हापूर सज्ज झाले आहे. या दौर्‍यात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्यूला देखील निश्‍चित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोल्हापूर अमित शाह यांची सासूरवाडी

अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या एस. एम. लोहिया शाळेमध्ये शिकल्या आहेत. सोनल शाह यांचे पाहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत घेतले आहे. त्यामुळे आजही सोनल शाह आपल्या मित्र मैत्रिणींच्या संपर्कात आहेत. त्यांना आजही शाळेबद्दल आपुलकी आहे. त्यामुळे सोनल शाह ज्या शाळेत शिकल्या त्या शाळेच्या संस्थेचं यंदा शताब्दी वर्ष साजरे होत आहे. या शाळेसाठी अमित शाह आणि सोनल शाह यांनी वेळोवेळी सहकार्य केलं आहे. म्हणूनच शताब्दी वर्षाच्या सांगता समारंभाला अमित शाह यांच्यासारखा दुसरा पाहुणा नाही असे देखील मत शाळेने व्यक्त केलं आहे. दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाच्या आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सोनल शाह यांनी अमित शाह यांच्याकडे आग्रह धरला होता. या आग्रहाखातर अमित शाह कोल्हापूरला येत आहेत.

कोल्हापूर सोबत त्यांचं विशेष नातं

अमित शाह हे कोल्हापूरचे जावाई आहेत. याचा खुलासा खुद्द अमित शाह यांनीच केला होता. याबाबत बोलतांना भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकात पाटील एकदा म्हणाले होते की, अमित शाह हे कोल्हापूरचे जावाई आहे, हे अमित शहांनीच त्यांना सांगितले होते. कोल्हापूरमध्ये शिकलेल्या सोनल शाह यांच्यासोबत त्यांच लग्न झालं आहे. त्यामुळे कोल्हापूर सोबत त्यांचं वेगळंच नातं राहिलं आहे. जे जेव्हाही कोल्हापूर किंवा जवळपास येतात तेंव्हा महालक्ष्मी मंदीरात जावून दर्शन घेतल्याशिवाय राहत नाहीत. काही वर्षांपुर्वी त्यांच्या पत्नी सोनल शाह या कोल्हापूरात आलेल्या. शाळेतल्या मैत्रीणांना त्या भेटल्या होत्या.