शहादा : शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर एका सुसाट फॉर्च्यूनर गाडीने पायी चालत असलेल्या माय-लेकाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. सोमवार, १७ रोजी रात्री सुमारे दहा वाजेदरम्यान ही घटना घडली. कल्पना गजानन वाघ आणि आकाश गजानन वाघ ( रा. द्वारकाधीशनगर ) मृत दोघांचे नाव आहे.
शहादा शहरातील द्वारकाधीशनगरात राहणारे कल्पना गजानन वाघ व आकाश गजानन वाघ हे पायी डोंगरगाव रस्त्यावरून आपल्या घराकडे जात होते. दरम्यान, भरधाव फॉर्च्यूनर ( क्र. एम.एच. 15,जे. ए.5055 ) यावरील अज्ञात चालकाने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात दोघा माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा : सावधान! जळगावात पुन्हा आढळला जीबीएस रुग्ण, तीन वर्षीय बालक बाधित
दरम्यान, हा रस्ता सायंकाळपासून पायी फिरणाऱ्या लोकांसाठी नेहमीच वर्दळीचा असतो, शिवाय या परिसरात गतीने जाणारी दुचाकी आणि चार चाकी वाहने मोठ्या प्रमाणावर दिसतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त होती.
पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाने या रस्त्यावर गतीरोधक बसविण्याची मागणी केली होती, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ते मागणी पूर्ण केली नाही.
हेही वाचा : नंदुरबारच्या शेतकऱ्यांसमोर कापूस विक्रीचे संकट, सीसीआय आणि खेडा केंद्रे बंद
परिणामी, काल या दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलीस प्रशासनाकडून भरधाव वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा : हृदयद्रावक! एकीकडे बारावीचे पेपर अन् इकडे वडिलांचं निधन, चेतनवर कोसळला दुःखाचा डोंगर
तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यांवर गतीरोधक बसविण्याची मागणी अजूनही अनुत्तरीत आहे. हा अपघात गतीरोधक असलेल्या उपाययोजना न झाल्यामुळे घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. येत्या काळात या घटनांच्या पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.