जळगाव । जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जळगाव भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांचे जनरल डब्बे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
खरंतर देशात दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या करोडोच्या घरात आहे. प्रत्येक रेल्वे गाडीला जनरल डब्बे असतात. परंतु अनेक वेळा रेल्वेचा जनरल डब्बा इतका भरलेला असतो की त्यात पाय ठेवायलाही जागा नसते. यातच अलीकडे रेल्वेनं जनरल डब्बे वाढविण्याचा निर्णय घेतलाय.
त्यानुसार आता दक्षिण-मध्य रेल्वेने विभागातील नऊ रेल्वे गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांत या नऊ रेल्वे गाड्यांना दोन अतिरिक्त सामान्य डबे जोडले जाणार आहेत. यातील दोन रेल्वे या जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या आहेत. रेल्वे क्रमांक १२७१५ आणि १२७१६ नांदेड-अमृतसर-नांदेड, २२७३७ आणि २२७३८ सिकंदराबाद-हिसार- सिकंदराबात या जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या गाड्या आहेत. या गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.