पती अंत्यविधी कार्यक्रमाला, पत्नी शेतामध्ये, घराला अचानक लागली आग अन् होत्याचं नव्हतं झालं

अक्कलकुवा : तालुक्यातील खटवानी येथे शेतातील घराला अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस, गहू व इतर धान्य, लाकडे जळून खाक झाले. यामुळे कुटुंब उघड्यावर आले असून याबाबत पंचनामा करण्यात आला आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील खटवानी गावातील रहिवासी उकड्या जेमा वसावे यांच्या शेतातील घराला 19 रोजी दुपारी अचानक आग लागली. घरमालक उकड्या जेमा वसावे हे जवळच्या गावात अंत्यविधी कार्यक्रमाला गेले होते. तर त्यांची पत्नी दुसऱ्या शेतावर गेली असताना सदर प्रकार घडला, अशी माहिती उकड्या जेमा वसावे यांच्या पत्नीने दिली.

यामध्ये घरातील संसार उपयोगी वस्तू, धान्य, कपडे, घरगुती सामान, तसेच विक्रीसाठी काढून ठेवलेला कापूस व गहू व इतर धान्य जळून खाक झाले. यामुळे शेतकरी परिवाराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातल्या घरात मोठ्या प्रमाणावर घराच्या लाकडी दांड्या व खांबे होते ते देखील जळून खाक झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे.  महसूल विभागाच्या वतीने आगीत नुकसान झालेल्या घटनेचा तपशील नोंद करण्यात आली असून नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.