रावेर : तालुक्यातील पाल येथे संशयास्पद स्थितीत आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला असून, त्या तरुणाने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेय. तर गावाच्या जावयाने आपल्या घराजवळच आत्महत्या केल्यामुळे आपली बदनामी होईल, या कारणाने हा मृतदेह सुकी नदीपात्रात टाकून प्रेताची अवहेलना (विटंबना) केल्याप्रकरणी सात जणांवर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाल येथील वन प्रशिक्षण केंद्राच्या खाली नदी पात्रात पाल गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रोडच्या बाजूला सुरेश सुमऱ्या बारेला (वय २५) या तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्याच्या गळा, मानेवर गळफासचे निशाण होते. हा तरुण मध्य प्रदेशातील कलोरी (ता. जि. खंडवा) येथील मूळ रहिवासी आहे. मात्र कामानिमित्त हल्ली मुक्काम दापुरे, ता. एरंडोल येथे आहे. त्याचा २६ मार्चला सकाळी दहाला मृतदेह मिळाला होता. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मृतदेहाची अवहेलना केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
मयताच्या गळ्यावर व्रण होते. यामुळे पोलिसांपुढे याचा तपास करणे मोठे आव्हान होते. दरम्यान, पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णांत इंगळे व पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक तयार करून या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठविले.
या पथकाने मयताची सासरवाडी पिंपरूड व पाल येथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या प्रकरणी मिळालेल्या गुप्त माहितीवरून गिरसिंग किर्ता बारेला, तेरसिंग कजम्या बारेला, सीताराम कजम्या बारेला, संजय रेजला बारेला, रेजला गोटा बारेला, धीचल सीताराम बारेला व बारसिंग नावडा बारेला सर्व रा. नवाड भाग, पिंपरकुंड शेतशिवार, ता. रावेर यांना ताब्यात घेतले. प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर यातील गिरसिंग बारेला यांनी सांगितले की, मी पाल येथून पिंपरकुंडकडे जात असताना नवाडजवळील अंजनाच्या झाडावर हरलाल राजाराम बारेला यांच्या जावयाने नारंगी पिवळसर दुपट्ट्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. या वेळी मी सर्वांना ही घटना सांगितली.
या घटनेमुळे आपली बदनामी होईल या कारणाने आम्ही मृतदेह खाली काढून तो पाल येथील सुकी नदी पात्रात आणून ठेवला. यामुळे मृतदेहाची अवहेलना (विटंबना) झाली. मयताची पत्नी चंपीबाई बारेला यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध मृतदेहाची अवहेलना (विटंबना) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.