तरुण भारत लाईव्ह । ७ सप्टेंबर २०२३। गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती पण आता आजपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान पाऊस पुन्हा परतणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
देशात पावसावर अल निनोचा प्रभाव दिसून आला त्यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा ब्रेक घेतला. पावसाच्या खंडामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आता सप्टेंबर महिन्यात चांगल्या प्रकारे पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सप्टेंबरच्या सुरवातीपासूनच राज्यात पुन्हा पाऊस परतल्याने सुकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हे क्षेत्र उत्तर पश्चिमकडे सरकण्याची चिन्हे आहेत त्यामुळेच पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. आज विदर्भातील काही भागात तसेच मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.