जळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाने महाराष्ट्रातील सर्व विभागांना मागे टाकत ७ मेस उत्पन्नाचा एक कोटीचा आकडा पार केला. आकडेवारीनुसार ७ मेपासून आजपर्यंत आलेले उत्पन्न एक कोटीपेक्षा जास्त आहे. अशी माहिती विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.
राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक, महिलांना ५० टक्के सवलत दिली आहे. यामुळे ‘आता प्रवास करेल, तर एसटी बसनेच’, असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. यात लग्नसराईमुळे गर्दी वाढली आहे. यामुळे बसस्थानकात मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. याचा चांगला परिणाम म्हणून एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
जळगाव विभागाने ७ ते ९ मे, असे सलग तीन दिवस एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिले. यात ९ मेस २ लाख ६३ हजार प्रवाशांनी बसने प्रवास केला. यात ९८ हजार महिलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे अमृत योजनेंतर्गत ३५ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्याचा निधीही जळगाव विभागाला मिळणार असून, प्रतिदिन बेरीज केली, तर दीड कोटीपेक्षा जास्त उत्पन्न आणण्याचा नवीन विक्रम जळगाव विभागाने केला आहे.
“जळगाव विभागाने सलग तीन दिवस एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. कोरोनानंतर असलेली मोठी लग्नसराई, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतीमुळे प्रवासी संख्येत वाढ झाल्याने इतके उत्पन्न मिळू शकले. यात कर्मचाऱ्यांचीही मेहनत आहे. – भगवान जगनोर, विभागीय नियंत्रक, जळगाव