तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात इस्लामवर नव्हे तर इस्लामी दहशतवादी संघटना इसिसवर आरोप करण्यात आले आहे, असे सांगून केरळ उच्च न्यायालयाने चित्रपटावरील बंदीची याचिका फेटाळूल लावली आहे.
लव्ह जिहाद, सेक्स स्लेव्ह आणि इसिसचे इस्लामी दहशतवादाचे जाळे ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाद्वारे प्रथमच मोठ्या पडद्यावर मांडण्यात आले आहे. हा चित्रपट शुक्रवारी देशभरात विविध ठिकाणी प्रदर्शित झाला आहे. त्यापूर्वी केरळ उच्च न्यायालयात या चित्रपटावर बंदी लादण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायमूर्ती एम. नागरेश आणि न्या. सोफी थॉमस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊन न्यायालयाने बंदीची विनंती करणारी याचिका फेटाळून लावली आहे.
यावेळी न्यायालयाने म्हटले की, चित्रपटाचे ट्रेलर बघितले असता त्यामध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायासाठी आक्षेपार्ह काहीही नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. चित्रपटात इस्लामच्या विरोधात काय आहे ?, यामध्ये धर्मावर कोणताही आरोप नाही. चित्रपटात हा आरोप इसिसविरुद्ध आहे. त्याचप्रमाणे याचिकाकर्त्यांपैकी कोणीही चित्रपट पाहिला नाही, असेही न्यायालयाने याचिका फेटाळताना आपल्या आदेशात नमूद केले आहे.
न्यायालयाने यावेळी चित्रपटांविषयी निवडक भूमिका घेणाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. न्या. नागरेश म्हणाले की, असे असंख्य चित्रपट आहेत ज्यात हिंदू संन्याशांना तस्कर किंवा बलात्कारी म्हणून दाखवण्यात आले आहे. मात्र, त्यावेळी असा कोणताही प्रकार घडत नाही, कोणीही निषेध करत नाही. असे अनेक हिंदी आणि मल्याळम चित्रपट आहेत, असेही न्या. नागरेश यांनी यावेळी स्पष्ट केले.