सध्या टीम इंडिया बार्बाडोसमध्ये सुपर-8 फेरीच्या पहिल्या सामन्यासाठी उपस्थित आहे. या कॅरिबियन बेटावर संपूर्ण संघ नेटमध्ये प्रचंड घाम गाळत आहे. ग्रुप स्टेजमध्ये फ्लॉप झालेला विराट कोहली जोरदार बॅटिंगचा सराव करत आहे. मंगळवार, 18 जून रोजी भारतीय संघाच्या सरावादरम्यान वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू सर वेस्ली हॉल मैदानावर पोहोचला. तेथे पोहोचल्यानंतर त्याने विराट कोहलीची भेट घेतली आणि त्याला त्याचे पुस्तक भेट म्हणून दिले.
हॉलने विराटवर केला प्रेमाचा वर्षाव
सर वेस्ली हॉल हे वेस्ट इंडिजचे महान वेगवान गोलंदाज आहेत. हॉलने 70 आणि 80 च्या दशकात वेस्ट इंडिजसाठी 48 कसोटी सामने खेळले आणि 192 बळी घेतले. त्याने 170 प्रथम श्रेणी सामन्यात 546 विकेट घेतल्या. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील सामन्यापूर्वी सर वेस्ली हॉल यांनी विराटला त्याचे पुस्तक भेट दिले. यानंतर तो हसताना आणि विनोद करताना दिसला. कोहली सुद्धा 86 वर्षांचा असलेल्या हॉलचे बोलणे खूप लक्षपूर्वक ऐकत होता आणि हसत होता.
विराट कोहलीने केला जबरदस्त सराव
2024 च्या T20 विश्वचषकात विराट कोहली आपल्या बॅटने आपली जादू दाखवू शकला नाही. ग्रुप स्टेजमध्ये त्याने 3 मॅचमध्ये बॅटिंग केली, ज्यामध्ये त्याला फक्त 5 रन्स करता आल्या. तो अमेरिकेविरुद्ध गोल्डन डकचा बळी ठरला, तर पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात त्याला केवळ 4 धावा करता आल्या. याशिवाय त्याने आयर्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात केवळ 1 धावा काढल्या होत्या. आता टीम इंडिया सुपर-8 मध्ये आहे आणि उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रत्येक सामना आवश्यक आहे. अशा परिस्थितीत विराट नेटमध्ये प्रचंड घाम गाळत आहे. रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करता याव्यात यासाठी त्याने पुल शॉट आणि लॉफ्टेड ड्राईव्हसारख्या फटक्यांचा सराव केला.
भारताचे सुपर-8 सामने
भारतीय संघाने या स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावलेला नाही. आता संघाला 20 जून रोजी बार्बाडोसमध्ये सुपर-8 चा पहिला सामना खेळायचा आहे. 22 जून रोजी त्यांची अँटिग्वा येथे बांगलादेशशी तर 24 जून रोजी सेंट लुसिया येथे ऑस्ट्रेलियाशी सामना होईल.