जळगाव : पाणी पिण्याच्या बहाण्याने भर दुपारी घरात शिरून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांना अवघ्या दहा वर्षीय चिमुकलीने हिंमतीने परतावल्याने शहरातील मुक्ताईनगरात वकिलांकडे दरोडा टळला. अल्पवयीन मुलीने हिंमत दाखवत दरोडेखोरांना पिटाळून लावल्याने तिच्या धाडसाचे कौतुक होत आहे. पिंक रीक्षातून आलेल्या दरोडेखोरांचा आता पोलिसांनी शोध सुरू केला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
भर दुपारी दरोड्याचा होता प्लॅन
जळगाव शहरातील मुक्ताईनगरात एस.एम.आय.टी.महाविद्यालाजवळ अॅड.सचिन देविदास पाटील (43) हे पत्नी विद्या पाटील व दहा वर्षीय मुलगी श्रृंगीसह वास्तव्यास आहेत. अॅड.पाटील हे जिल्हा न्यायालयात वकिल असून त्यांच्या पत्नी विद्या पाटील जळगाव शहरातील एका शाळेत शिक्षिका आहेत. बुधवारी सचिन पाटील व विद्या पाटील हे दोन्ही नोकरीवर निघून गेल्यानंतर श्रृंगी घरी एकटीच होती. बुधवारी दुपारी दोन वाजता काही अज्ञात लोकांनी बेल वाजवल्यानंतर श्रृंगीने लोखंडी दरवाजाला लावलेले कुलूप न उघडता लाकडाच्या दरवाजातून डोकावल्याने संशयीतांनी पिण्यासाठी पाणी मागितले मात्र श्रृंगीने पाणी देण्यास नकार दिला तसेच संशयीतांनी पाणी पाज नाहीतर दरवाजा तोडून आतमध्ये शिरण्याची धमकी दिली मात्र श्रृंगीने हिंमत दाखवून दरवाजा उघडला नाही. तब्बल 15 मिनिटे दरोडेखोर दरवाजाजवळ थांबून होते मात्र श्रृंगीने प्रतिसाद न दिल्याने दरोडेखोरांना आल्या पावली परतीची वाट धरावी लागली.
वर्दळीच्या परीसरातील घटनेने खळबळ
खिडकीतून श्रृंगीने शेजारच्यांना आवाज दिल्यानंतर महिला धावतच श्रृंगी हिच्याकडे आली, महिलेला तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर श्रृंंगीची आई विद्या पाटील यासुद्धा घरी आल्या व सायंकाळी अॅड.सचिन पाटील घरी परतल्याने घडला प्रकार मुलीने सांगताच त्यांनादेखील धक्का बसला. त्यांनी तातडीने रात्री दहा वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी वकिलांच्या घरी रात्री उशिरा जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली असून संशयीतांचा शोध सुरू करण्यात आला आहे.