बिहार : तरुण-तरुणीचा एकमेकांवर जीव जडला आणि दोघांनी लग्न केल्याचं आपण अनेकदा वाचलं असेल. मात्र बिहारमध्ये एक अनोखा विवाह पार पडला आहे. दोन तरुणींनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली आहे. लग्न झाल्यावर सर्वत्र या दोघींच्या विवाहाची जोरदार चर्चा रंगली. दरम्यान, आता या दोन्ही तरुणी गायब असल्याचं म्हटलं जात आहे.
सूत्रानुसार, बिहारच्या डुमरावमध्ये ही घटना घडली आहे. डुमरावच्या डुमरेजानी या मंदिरात दोन्ही तरुणींचा विवाह सोहळा पार पडला. अमिषा आणि पायल अशी या दोघींची नावं आहेत. या दोन्ही तरुणी गेल्या तीन वर्षांपासून एकमेकींना ओळखत होत्या. त्या दोघी एका ऑर्केस्ट्रा पार्टीत डान्सरचं काम करत होत्या. सुरूवातीला त्यांच्यात मैत्री झाली. पुढे हीच मैत्री प्रेमात बदलली गेली. त्यामुळे पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक नागरिकांनी माहिती दिली की, दोघींनी लग्न केले तेव्हा ऑक्रेस्ट्रा पार्टीतील सर्व व्यक्ती उपस्थित होत्या. या दोघींनी त्यांनी घेतलेला निर्णय कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे का हे तपासले. त्यानंतर त्यांनी मंदिरात सप्तपदी घेत एकमेकींचा पती -त्नी म्हणून स्विकार केला. अमिषा आणि पायल या दोघींपैकी अमिषा ही पती आहे तर पायल पत्नी आहे. अमिषाला लहान असतानापासून तिच्यातील या बदलाची माहिती होती. तिला नेहमीच मुलींकडे आकर्षण होतं. त्यामुळे काम करताना तिला पायल आवडली आणि दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.