जळगाव : मुलीला शाळेत घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेला अज्ञात महिलेने गुंगवून विहिरीत फेकून दिले. हा धक्कादायक प्रकार मंगळवार, २५ रोजी सकाळी शिरसोली येथे उघडकीला आला. सुदैवाने विवाहितेचा जीव वाचला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दीपिका दीपक पाटील (२६) असे महिलेचे नाव आहे.
जळगाव शहरातील नेहरूनगरात दीपिका दीपक पाटील ( २६) या पती, मुलांसह वास्तव्याला आहे. सोमवार, २४ जून रोजी दुपारी एक वाजता मुलीला शाळेत घ्यायला गेल्या होत्या. दरम्यान, रस्त्यावर एक अनोळखी महिला भेटली. त्या महिलेने विवाहितेच्या डोक्यावरून हात फिरवल्याने तिची शुद्ध हरपली. तास-दीड तासाने विवाहितेला गुंगीत असताना जाणवले की, आपण पाण्यात असून एका विहिरीत असल्याचे समजले. मात्र गुंगी असल्यामुळे त्यांना हालचाल करता येत नव्हती.
दुसरीकडे शाळेत मुलीचे पालक तिला घेण्यासाठी आले नाही म्हणून शिक्षकांनी मुलीच्या वडिलांना फोन केला. तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितले की, तिची आई तिला शाळेत घ्यायला गेली आहे. मात्र, ती शाळेत न पोहचल्याचे लक्षात येताच मुलीच्या वडिलांनी काकूला पत्नीला पाहण्यासाठी व मुलीला घेण्यासाठी पाठवले.
दिवसभर व रात्रभर शोध घेतल्या नंतर देखील विवाहिता मिळून आली नाही. विवाहितेने सोमवारची पूर्ण रात्र विहिरीत काढली. दरम्यान, शिरसोली येथे मुख्तार मुनाफ कुरेशी हे त्यांच्या आकाशवाणी जवळील शेतातील विहिरीजवळ गेले असता त्यांना सदरहू महिला ही विहिरीत बसलेली दिसून आली.
तात्काळ पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळविले. गावकऱ्यांनी तिला दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढले. गावातीलच एका तरुणाने तिला ओळखले. त्याच्या मित्राची ती पत्नी असल्यामुळे त्याने त्याच्या मित्राला कळवले.
सदर महिलेला शासकीय वैद्यकीय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून तिच्या नातेवाईकांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.