तरुण भारत लाईव्ह ।२२ जानेवारी २०२३। जळगाव शहरातील व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर पार्किंग जागेत काढण्यात आलेल्या दुकानावर कारवाई करण्यास मनपा नगररचना विभाग तयार आहे. मात्र महापौर, उपमहापौरांकडून कारवाई थांबविली जात आहे का? असा आरोप नगरसेवक चेतन सनकत यांनी केला आहे. त्यामुळे आता ही कारवाई न करण्यामागचे गौडबंगाल काय? हे उघड होणे गरजेचे असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.
वाहनधारकांवर कारवाई
संकुलाचा पार्किंग प्रश्न ऐरणीवर असतानाच शहर पोलीसांनी दुचाकी वाहनधारकांवर कारवाई केल्यामुळे आता संकुलातील पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. व्यापारी संकुलाच्या बांधकाम नकाशात पार्किंग दाखविण्यात आले आहे. मात्र अनेकांनी त्या पार्किंग जागेत दुकाने बांधलेली आहेत. महानगरपालिकेने शहरातील नेहरू चौक ते घाणेकर चौक मार्गावरील दुकानांचे सर्वेक्षण करून तब्बल 19 व्यापारी संकुलाच्या पार्किंगमधील दुकानावर कारवाईबाबत प्रस्ताव दाखल केलेला आहे. मात्र पदाधिकारी कारवाईस विरोध करीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
नगरसेवकांचाही आरोप
व्यापारी संकुलातील या पार्किंग दुकानावर होणार्या कारवाईला पदाधिकार्यांनीच विरोध केला असल्याचा आरोप नगरसेवक चेतन सनकत यांनी केला आहे.
याबाबत नगरसेवकांनी सांगितले की, शहरातील व्यापारी संकुलाच्या पार्किंमधील दुकानावर कारवाई करून त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्याबाबत महापौर व उपमहापौर आम्हाला बैठकिसाठी बोलावत होते. प्रत्येक वेळी बैठकित हाच विषय ते करीत होते. मात्र नगररचना विभागाने दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश काढल्यानतर मात्र ते गप्प झाले आहेत. आता कोणत्याही बैठकित महापौर व उपमहापौर या कारवाईबाबत विषय काढत नसून त्या विषयी बोलत नाहीत. ते आता का बोलत नाहीत ? याचा खुलासा व्हायला हवा, की त्यांना या विषयाचा विसर पडला आहे ? अशी मागणीही नगरसेवकांनी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत या नेहरू चौक ते घाणेकर चौक भागातील व्यापारी संकुलाच्या पार्किंगमधील दुकानावर कारवाई करण्यात यासाठी महापौर व उपमहापौर यांनी आपली भूमिका त्वरीत स्पष्ट करावी, अशी मागणीही यावेळी केली आहे.