तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर जोशी । निवडणुका म्हटल्या म्हणजे एका गटाचा जय तर दुसर्या गटाचा पराजय हे ठरलेलेच. मात्र ज्या वेळी सर्व बाबी अनुकूल असताना पराभव होतो त्यावेळी नक्की काही कारणे ही असतातच असतात. गेला महिना जवळपास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमुळे गाजला. ग्रामीण व शहरी भागासाठी या निवडणुका असल्यामुळे दोन्ही ठिकाणी वातावरण चांगलेच तापले होते. अनेक हौशी मंडळी निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. माघारीच्या दिवशी तर विविध राजकीय पक्षांच्या पॅनलप्रमुखांची दमछाक झाली आणि त्यानंतर सुरू झाली प्रचाराची रणधुमाळी. जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत होती तसतशी प्रचाराची रंगत वाढत होती. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी चांगलाच जोर लावल्याचे चित्र होते.
भाजप-शिवसेना यांच्या विरोधात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना उबाठा गट अशी लढत दिसत होती. मतदान झाले आणि निवडणूक निकालाची उत्सुकता लागली. अखेर निकालही घोषित झाला. या निवडणुकीत भाजपने पहिला क्रमांक राखला. त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उबाठा गट, शिवसेना शिंदे गट आणि शेवटी कॉंग्रेस अशी परिस्थिती होती. युती विरूद्ध आघाडी अशी लढत झाली आणि निकालात अनेक धक्के बसले.
पारोळ्यात शिवसेनेला म्हणजे आमदार चिमणराव पाटील यांना धक्का बसला. तीच परिस्थिती जळगाव या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची झाली. पाचोर्यात आमदार किशोर पाटील यांना जेमतेम यश मिळाले. तर बोदवडला आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला. या विरूद्ध भाजपने चाळीसगाव, भुसावळसारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा विरोध असताना यश मिळविले. भुसावळात आमदार संजय सावकारे यांनी आमदार एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का दिला. अमळनेरात पूर्वी भाजपची सत्ता होती. तेथे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार स्मिता पाटील यांना शह दिला. जामनेरात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे तर सतत बाहेर असताना त्यांनी एकहाती सत्ता मिळविली. तर चोपड्यात मागे पडलेल्या आमदार लताताई सोनवणे यांनी बाजी मारली. जिल्ह्यातील परिस्थिती पहाता शिवसेना शिंदे गट सर्वाधिक आमदार असताना मागे पडल्याचे दिसून येते. याची कारणमीमांसा लक्षात घेता सत्ता आहे पण संघटन अद्याप बळकट झाले नसल्याचेच लक्षात येते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मात्र मतदारसंघात भक्कम संघटन असताना त्यांना अपयश आल्याचे दिसते.
जिल्ह्यात अन्य तालुक्यात मात्र पक्षाचे संघटन म्हणावे तसे अद्याप झालेले नाही. मूळ शिवसेनेत फुट पडल्यानंतर राज्यात सर्वाधिक आमदार हे जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटात आले. त्यामुळे उद्धव गटाकडून सर्वाधिक टार्गेट पालकमंत्री गुलाबराव पाटील व पक्षाचे जिल्ह्यातील अन्य आमदार झाले. त्याची परिणीती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासारखी मंडळी जिल्ह्यात येऊन त्यांनी या पाच आमदारांवर टीकेची झोड उठवत विविध आरोप केले आहेत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा जिल्ह्यात नुकताच दौरा झाला. यावेळी बरेच वाक्युद्ध झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा इशारा आणि त्याला उद्धव ठाकरे व त्यांच्या अनुयायांनी दिलेले सडेतोड उत्तर राज्यभर गाजले. त्या पाठोपाठ कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी गाजली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या, सभा घेतल्या. मात्र त्या तुलनेत त्यांना यश मिळू शकले नाही. याविरूद्ध भाजपने संघटन कौशल्याच्या जोरावर बर्याच बाजार समित्यांमध्ये सत्ता काबीज केली. आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ शिवसेना आमदार तसेच पालकमंत्र्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. आगामी काळ हा तर निवडणुकांचा आहे.
महापालिका, जिल्हा परिषदा त्यानंतर विधान परिषद, लोकसभा, विधानसभा अशी निवडणुकांची मालिका एका पाठोपाठ सुरू होईल. जळगाव ग्रामीण मतदार संघात आजच्या परिस्थितीत सर्वाधिक ताकद ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीच आहे, हे नाकारून चालणार नाही, मग काही फारशी ताकद नसलेल्यांनी यश मिळविणे परवडणारे नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.