विरोधकांच्या आघाडीचं नाव युपीए नव्हे तर ‘INDIA’

बंगळुरू : बंगळुरू येथे विरोधकांच्या वतीने दोन दिवसीय बैठकीचं आयोजन कऱण्यात आले होते. याच बैठकीत विरोधकांच्या आघाडीला INDIA असं नाव देण्यात आलं आहे. अर्थात I- Indian, N – National, D-Democractic, I- Inclusive, A- Alliance असं हे नाव आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

या नावाचा अर्थ भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी असा असू शकतो. मात्र याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीत २६ विरोधीपक्ष उपस्थित होते. याच बैठकीत आगामी काळातील नियोजन निश्चित करण्यात आलं आहे.

विरोधी आघाडीच्या INDIA चा अर्थ काय?

I – भारतीय (Indian)
N – राष्ट्रीय (National)
D – लोकशाही (Democratic)
I – सर्वसमावेशक (Inclusive)
A – आघाडी (Alliance)

बंगळुरूमध्ये जमलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटले, “ही एक चांगली आणि अर्थपूर्ण बैठक आहे. आज झालेल्या चर्चेनंतरचा निकाल या देशातील लोकांसाठी योग्य असू शकतो.” दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत बोलताना ‘सर्वजण मिळून भाजपचा पराभव करू’ असा विश्वास व्यक्त केला.

काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदात रस नाही, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुग खरगे यांनी सांगितले. आपली राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यांचे रक्षण करण्याचा आमचा हेतू आहे. तसेच राज्य पातळीवर विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. मात्र हे मतभेद विचारधारेशी संबंधित नाहीत, असे खरगेंनी स्पष्ट केले.