जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२४ । सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून यादरम्यान मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधानपरिषदेत संमत करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव मांडला.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावे बदलण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर ही रेल्वे स्टेशनची नावे बदलण्यात येतील.
मध्य रेल्वे मार्गावरील करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून लालबाग रेल्वे स्थानक, सॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून डोंगरी रेल्वे स्थानक, पश्चिम मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मुंबादेवी रेल्वे स्थानक, चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून गिरगाव रेल्वे स्थानक, हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीनचे काळी चौकी रेल्वे स्थानक, डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून माझगाव रेल्वे स्थानक, किंग्ज सर्कल स्थानकाचे नाव तिर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक याप्रमाणे बदलण्यात यावेत, अशी शिफारस महाराष्ट्र विधानपरिषद केंद्र शासनास करीत आहे, असा ठराव संमत करण्यात आला.