नंदुरबार : आरोग्य जागरूकता दृढ करणारा एक विवाह सोहळा काल रविवारी शहादा शहरात पार पडला. विवाहात येणाऱ्या वऱ्हाडींना रक्तदान बाबत जागरूकता निर्माण केल्याने त्यातील तब्बल ४४ जणांनी रक्तदान करत अनोखा ‘आहेर’ नव दामपत्याचा नावे केला. विशेषतः नवरदेव आणि नवरिने देखील सहजीवनाचा प्रारंभ विधायक कार्यानं व्हावा म्हणून दोघांनी विवाहानंतर लगेचच रक्तदान करत अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला.
धडगाव येथील रघुनाथ निकवाडे यांचा मुलगा सागर निकवाडे व राधेश्याम मोरे यांची कन्या नेहा मोर यांचा विवाह सोहळा रविवार, १७ रोजी शहादा शहरात पार पडला. यावेळी ‘वर, सागर’ याने रक्तदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या इच्छेनुसार वधूसह तिच्या पालकांनी आणि लग्नात सहभागी झालेल्या सर्व वऱ्हाडीनी संमती देत रक्तदान शिबिर पार पाडत अनोखा आहेर दिला आहे. नंदुरबार येथील जनकल्याण ब्लड बँकेच्या पथकाने हे रक्त संकलित केले.
रक्तदान हाच एकमेव पर्याय
विज्ञाना मुळे कितीही क्रांती झाली असली, तरी, पृथ्वीतलावर अजूनही कृत्रिम रक्ताची निर्मिती शक्य झालेली नाही. त्यामुळे रक्तदान हाच एकमेव पर्याय आहे. तात्काळ रक्त पुरवठा झाला नाही तर एखादा रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता असते. रक्तदान, सर्व श्रेष्ठ दान म्हटले जाते. मात्र सर्वदूर रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने सामाजिक संस्था, शासकीय व खाजगी रुग्णालय रक्त संकलन वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांत या विवाहाने योगदान दिले.