पोलीसांचा असाही संवेदनशील पणा!

अमळनेर : आई आपल्या कुटुंबासाठी टोपल्या विकत असताना सात वर्षाची  मुलगी कुठे विसरली हे कळताच  ती बिथरली  अन् अमळनेर पोलीस स्टेशन गाठले. लहान मुलगी असल्याने पोलीसही संवेदनशील बनले गल्लोगल्ली शोध घेताच  काही वेळातच मुलगी सापडली. मुलीला पाहताच आईने तिला मिठी मारली आनंदाश्रू गाळत पोलीसांचे आभार मानले.
पारोळा तालुक्यातील उंदिरखेडा  रस्त्यावरील संगीता कचरू वाकोडे ही महिला प्लास्टिक टब विक्री करून आपला उदरनिर्वाह करते. पोटासाठी ती आपल्या सात वर्षाची  चिमुकली अंजली कचरू वाकोडे हिला घेऊन गावोगाव फिरत असते. १ रोजी ती अमळनेर येथे आली असता टब विक्री करता करता मुलगी कुठे हरवली तिला उमगलेच नाही. ती पूर्णतः घाबरली होती. मुलीला कोणी पळवून नेले की काय म्हणून भीती व्यक्त केली जात होती.
आईने  रडत पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्यासमोर व्यथा मांडली. शिंदे यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, शरीफ पठाण, अमोल पाटील, श्रीराम पाटील यांना वेगवेगळ्या ठिकाणी  रवाना केले.
महिला कोणत्या भागातून आली याची माहिती घेत पोलिसांनी गल्लोगल्ली शोध घेतला. आणि काही तासात ती  बसस्थानक परिसरात  सापडली. मुलीला पोलीस स्टेशनला आणताच आईने मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि पोलीसांचे आभार मानून ती पुन्हा आपल्या व्यवसायाला निघून गेली.