राजकीय वातावरण तापणार; वाचा सविस्तर

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रासह देशभरात सावरकर प्रेमींकडून असंतोष व्यक्त करण्यात आला होता. सत्ताधारी भाजप-शिवसेनेने राहुल यांच्या टीकेचा निषेध करत सावरकर गौरव यात्रा देखील काढली होती. सावरकरांवरील टीकेनंतर महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण होताच राहुल गांधींनी आपले ट्विट देखील डिलीट केले होते. महाविकास आघाडीत सावरकर प्रकरणावरून चर्चा सुरु असतानाच काँग्रेसकडून पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यात आला आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे आता पुन्हा महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात सावरकरांविषयी चुकीचा संदर्भ देत टीका करण्यात आली आहे. ”हे लोक कधीही फुले शाहू आणि आंबेडकर विचारांचा मोर्चा काढत नाहीत तर ते सावरकरांचा मोर्चा काढतात. बलात्कार हे राजकीय विरोधकांच्या विरोधात वापरण्यात येणारे राजकीय हत्यार म्हणून त्याचा वापर केला जावा असे सावरकरांनी म्हटले होते. अशा विचारांचा मोर्चा काढला जात असेल तर माझ्यासह इतर महिलांना कसे सुरक्षित वाटेल ?” अशी टिप्पणी त्यांनी गुरुवारी एका सभेत बोलताना केली होती. मात्र त्यांनी जो संदर्भ वापरून ही टीका केली आहे, त्या पुस्तकात असा कुठलाही उल्लेख नसल्याचा दावा सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला आहे.
राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता
काँग्रेस नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने केल्या जाणाऱ्या टिप्पणीमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधींनी आपले ट्विट मागे घेतल्यानंतर काहीसा अल्पविराम लागलेला हा विषय आता पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राहुल गांधींचा विधानावरून संतप्त झालेल्या भाजप शिवसेना युतीने सावरकरांचे कार्य महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढल्या होत्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वतः या यात्रांमध्ये सहभागी होत काँग्रेसच्या सावरकर विरोधी टिप्पणीचा जोरकसपणे निषेध करत काँग्रेसला खडसावले होते. त्यातच काँग्रेस नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनी केलेल्या या टिप्पणीमुळे भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता असून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहे.
वडेट्टीवारांविरोधात कायदेशीर कारवाई करणार !
”स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात काँग्रेसकडून केली गेलेली टिप्पणी पूर्णतः तथ्यहीन आहे. ज्या पुस्तकाचा संदर्भ पकडून हे विधान करण्यात आले आहे, असे कुठलेही वाक्य सावरकरांनी म्हटलेले नाही. ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात सावरकर म्हणतात की जेव्हा इस्लामी आक्रमक भारतावर स्वारी करून आले तेव्हा त्यांची युद्धपद्धती अत्यंत क्रूर होती. युद्धसमाप्तीनंतर पुरुषांची धर्मांतरे आणि महिलांवर अन्याय अत्याचार करणे ही इस्लामी आक्रमणकर्त्यांची पद्धत होती हे इतिहासात नमूद आहे. पण हिंदू राजे या पद्धतीचा वापर करत होते. मात्र जर त्यांनी या पद्धतीचा वापर केला असता तर कदाचित असंख्य हिंदू स्त्रियांची अब्रू वाचली असती,” असे सावरकरांनी म्हटलेले आहे. हे संदर्भ जर तर च्या आधारावर असून त्यात कुठेही ही पद्धती अंमलात आणण्याचे सावरकरांनी म्हटलेले नाही. शिवानी वडेट्टीवार यांनी केलेले विधान पूर्णपणे चुकीचे असून सावरकरांची बदनामी करणारे आहे. त्यामुळे सावरकरांवर करण्यात आलेल्या या विधानाविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”
– सात्यकी सावरकर, सावरकरांचे नातू