राष्ट्रपतींनी केशवस्मृती शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना केले संबोधित

तरुण भारत लाईव्ह न्यूज । हैदराबाद : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून हैदराबाद येथील केशव स्मृती शिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज उपस्थित विद्यार्थी तसेच शिक्षक वृंदाला संबोधित केले. राष्ट्रपतींनी यावेळी, प्रादेशिक स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची माहिती देणाऱ्या ‘हैदराबाद मुक्ती चळवळ’ या विषयावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे देखील उद्घाटन केले.

या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, शिक्षण म्हणजे देशाची उभारणी ज्या भक्कम पायावर केली जाते तो पाया आहे. प्रत्येक व्यक्तीकडे असलेल्या संपूर्ण क्षमतांचा अविष्कार करणारी ही गुरुकिल्ली आहे.केशव स्मृती शिक्षण संस्थेतील उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे, 1940 मध्ये लहानशा शाळेच्या स्वरुपात असलेली ही संस्था आता 11,000 हून अधिक विद्यार्थी तसेच 9 विविध महाविद्यालये असणारे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र झाले आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की आज घडीला देशभर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा ऐतिहासिक टप्पा साजरा होत असताना, आपण हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे की आपले स्वातंत्र्य म्हणजे केवळ भूतकाळातील अन्यायी राज्यकर्त्यांकडून मुक्तता नव्हे. आता भविष्याकडे वाटचाल करत असताना, आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या पायावर आपल्या देशाची उभारणी होईल आणि आपला देश नवनव्या उंचीवर जाईल याची सुनिश्चिती भारताच्या युवा वर्गाने करणे गरजेचे आहे. या स्वातंत्र्याचा अर्थ, आपण जे कार्य हाती घेऊ त्यात कठोर मेहनत करणे आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असणे. त्याचा अर्थ, आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देण्याची इच्छा असणारे अधिक जबाबदार तसेच कटिबद्ध नागरिक तयार होणे. म्हणजेच, आपल्या घटनेने दिलेली मूल्ये तसेच आदर्श कायम राखण्यासाठी प्रयत्न करणे आणि अधिक समावेशक तसेच समतोल समाजाच्या निर्मितीसाठी काम करणे, हवामान बदलाच्या समस्येशी लढा देऊन भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्या ग्रहाचे जतन करणे देखील आवश्यक आहे.

वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की वाचनाची सवय म्हणजे स्वयं -विकासाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. हे एक कौशल्य असून ते विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडते. हे इंटरनेटचे आणि समाज माध्यमांचे युग असून या काळात लक्ष देऊन काम करण्याचा कालावधी कमी होत चालला आहे आणि संवाद हा अक्षरांमध्ये मर्यादित झाला आहे असे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी त्यांची समज सुधारण्यासाठी आणि दृष्टीकोन अधिक विस्तृत करण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात वाचन केले पाहिजे असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केले.