९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर (जि. जळगांव) येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध साहित्यक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे भूषविणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमाची पत्रिका जाहीर करण्यात आली असल्याची माहिती मराठी वाङमय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली. या संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवि संमेलन आदि कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या  कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी संमेलनपूर्व कार्यक्रम म्हणून बालमेळावा आयोजित केला आहे. यात बालनाट्य तसेच साने गुरुजींच्या जीवनावर आधारित नाट्य प्रवेश-नाट्यछटा, गाणी सादर होतील.

 

दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी संमेलानाची सुरुवात सकाळी ७.३० वा. ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर स.१०.३० वा. उद्घाटन समारंभा आधी ध्वजारोहण व ग्रंथ दालनाचे उद्घाटन करण्यात येईल. दु.२ वा. बालसाहित्य संमेलनातील निवडक कार्यक्रमाचे सादारीकरण होईल. दु.३.३० वा. मुख्य सभागृहात होणाऱ्या परिसंवादाचा विषय आहे, राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय संध्याकाळी ५.३० वा. कविसंमेलन होईल. रात्री ८.३० वा. स्थानिक लोकांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या सभागृहात दु. २.३० वा. कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक या विषयावर परिसंवाद होईल. दु. ३.३० वा. शासकीय परिसंवाद सादर होईल. संध्या. ५ वा. स्थानिक वक्ते स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान या विषयावर भाषण करणार आहेत.

 

दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी संमेलनाची सुरुवात स.९ वा. गिरीश प्रभुणे यांच्या मुलाखतीने होईल. मुख्य मंडपात स. ११ वा. आजच्या मराठी साहित्यातून जीवनमूल्ये हरवत चालली आहेत का? आणि दु.१२ वा. अलक्षित साने गुरुजी या विषयांवर परिसंवाद आयोजित केले आहेत. यांत साने गुरुजींच्या पुतणी सुधाताई साने यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दु.२ वा. होणाऱ्या परिसंवादाचा विषय आहे ‘आंतरभारती काल-आज-उद्या.’ दु.२ वा. आठवणीतल्या कविता-रसास्वाद नंतर संध्या. ६ वा. कविसंमेलन-२ होणार आहे. रात्री ८.३० वा. स्थानिक लोकांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सभागृह २ मध्ये स.१० वा. चैत्राम पवार यांची मुलाखत नंतर दु.११ वा. मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे या विषयावर परिसंवाद होईल. दु. १२.३० वा. स्थानिक बोलीभाषेवर कार्यक्रम सादर करतील. दु. १.३० वा. कथाकथन. दु. ४ वा. कळ्यांचे निःश्वास परीचर्चेचा कार्यक्रम सादर होईल. संध्या. ६ वा. स्थानिक लोकांचा अभिवाचनाचा कार्यक्रम होईल.

 

दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी स.९ वा. श्री. बाबा साहेब सौदागर यांची मुलाखत. नंतर स.१०.३० वा अभिरूप न्यायालय यांत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज नाहीत या विषयावर चर्चा होईल. दु.१२ वा. परिसंवादः मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल आयोजित केला आहे. दु.३ वा. लेखिका मीना प्रभू आणि प्रकाशक चंद्रकांत लाखे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. दुसऱ्या मंडपात स.९.३० वा. होणाऱ्या परिसंवादाचा विषय आहे वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य. स. ११ वा. साहित्यिकांचे शताब्दी स्मरण मध्ये शाहीर साबळे, जी.ए. कुलकर्णी, के.ज. पुरोहित-शांताराम, श्री. पु. भागवत, विद्याधर गोखले, विद्याधर पुंडलिक, इ. साहित्यिकांचे स्मरण करण्यात येईल. दु. २ वा. भारतीय तत्वज्ञान एक वैभवशाली संस्कृती या विषयावर परिसंवाद होईल. तसेच दोन दिवस कवी कट्टा, एक दिवस गझल कट्टा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.