मालेगाव : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. रोजच एकमेकांवर टीका, आरोप केले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या मालेगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. 26 मार्चला उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज मालेगावमध्ये दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेडमध्ये सभा झाली होती. त्यानंतर ते राज्यातील इतर ठिकाणीही सभा घेणार आहेत. 26 मार्चला उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि गटावर हल्लाबोल केला आहे. तर एकनाथ शिंदे सोडून शिवसेनेत पुन्हा सगळे येतील, पण आम्ही एकनाथ शिंदे यांना घेणार नसल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
तसेच मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो गद्दारांचा नाही म्हणत त्यांनी यावेळी अप्रत्यक्षरित्या दादा भुसे यांनाही लक्ष केलं आहे. राज्यातील मुस्लिम समाजही आमच्या पाठिमागे असल्याचा दावा यावेळी राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पुढे बोलताना राज्य सरकारवर देखील सडकून टीका केली आहे. राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. आदिवासी रस्त्यावर उतरले आहेत.
कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यात सरकार आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कधीही घरी जावे लागू शकते हे त्यांना माहित आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.