---Advertisement---
भुसावळ, प्रतिनिधी : यावल येथील बाबूजीपूरा भागात ६ वर्षीय बालकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. अखेर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून खुनाचा उलगडा केला आहे. दरम्यान, आरोपीला अटक करून यावल न्यायालयात हजर केले असता, आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यावल शहरातील बाबुजीपुरा भागातील रहिवासी हन्नान खान (वय ६) हा मजीद खान यांचा मुलगा शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजेपासून बेपत्ता असल्याची तक्रार आई-वडिलांनी केली. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र तो सापडला नाही. दरम्यान, अखेर शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या बालकाचा मृतदेह त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या बिस्मिल्ला खलीफा दस्तगीर खलीफा यांच्या दुमजली घरातील वरच्या मजल्यावर एका कोठीत जळालेल्या अवस्थेत मिळून आला.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली व घटनास्थळी प्रचंड जमाव एकत्र झाला. जमावास शांत करण्याकरीसाठी डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे, शरद कोळी, सहायक पोलिस निरीक्षक अजय वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलिस उपनिरीक्षक एम.जे.शेख तसेच मुस्लिम समाजातील मान्यवरांनी प्रयत्न केले होते. मात्र. खुनाचे कारण समोर आलेले नव्हे, अखेर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून खुनाचा उलगडा केला आहे.
पोलिसांनी आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला (२२) याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्याला यावल न्यायालयात हजर केले असता आठ दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे.
जुन्या वादातून खून
आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला याने जुन्या वादातून हन्नान शेख याला पहिले गळा दाबून ठार मारले. नंतर जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, अशी प्राथमिक माहिती पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली आहे.