नव्या भिंद्रनवालेंचा उदय?

‘भिद्रनवाले २.२’ या उपाधीने सजलेला अमृतपाल सिंग पंजाबमध्ये धिंगाणा घालत होता, तेव्हा केजरीवाल व मान उद्धव ठाकरेंचे कौतुक करण्यात मुंबईला व्यस्त होते. रिबेरोंसारख्या अधिकार्‍याने हे राजकीय वास्तव दुर्लक्षित करून केंद्राने काय करावे, याचा सल्ला दिला आहे.

ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारी, युवा पिढीला पडलेला अमली पदार्थांचा विळखा, कर्करोग, शेतकर्‍यांचे प्रश्न, या आणि अशा कितीतरी प्रश्नांनी बेजार झालेल्या पंजाबमध्ये आता एका नव्या संकटाची चाहूल लागली आहे. धर्माचा अतिरेकी वापर करून राजकीय वर्चस्व टिकविण्याची स्पर्धा असलेल्या या राज्यात एका नव्या व्यक्तिमत्वाचा उदय होत आहे. राजशकट चालविणे हा एक मानसिक वर्चस्वाचा खेळ असतो. राज्याचा प्रमुख राज्य करण्यासाठी आहे की समन्वय राखण्यासाठी, या दोन घटकात त्याच्या राज्यकाराभाराचा प्रभाव दडलेला असतो. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री या दोन्ही निकषांवर पूर्णपणे फसले आहेत. पर्यायाने असा माणूस मग हुल्लडबाजांच्या लांगूलचालनाचा आणि त्यांच्या मर्जीवर स्वत:ची खुर्ची सुरक्षित ठेवण्याचा मार्ग स्वीकारतो. ‘आप’च्या राज्यात पंजाबमध्ये हेच झाले आहे. मोठ्या मुष्किलीने केंद्र सरकारने हे राज्य फुटीरतावाद्यांच्या जबड्यातून काढून आणले. आता मात्र ते पुन्हा त्याच दिशेने जाण्याची भीती निर्माण झाल्याचे दिसते. या भीतीचे कारण आहे नव्याने आकाराला आलेला त्यांचा म्होरक्या. ज्याचे नाव आहे अमृतपाल सिंग.

अमृतपाल सिंगने गेल्या आठवड्यात आपल्या एका सहकार्‍याला पोलिसांनी अटक केली म्हणून आंदोलन उभे केले. वस्तुत: हे आंदोलन ज्याप्रकारे आकाराला आले आहे तो ‘पॅटर्न’ आणि पुरोगामी मंडळींनी ज्या प्रकारची बोंबाबोंब आतापासून सुरु केली, ती समजून घेणे आवश्यक आहे. तुफान सिंग या अमृतपाल सिंगच्या सहकार्‍याला अपहरणाच्या आरोपाखाली कपुरथाला पोलिसांनी अटक केली. गुन्हा अपहरणाचा होता तरीसुद्धा त्याला सोडविण्यासाठी अमृतपाल सिंग आणि त्याचे सहकारी सशस्त्र होऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले. हे करण्यापूर्वी त्या जमावाने भरपूर हिंसक कारवाया केल्या. सरकारी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. अमृतसर-दिल्ली महामार्गावर ‘रास्ता रोको’ केले. अमृतपालने इतका दबाव निर्माण केला की, दुसर्‍या दिवशी पोलिसांनी न्यायालयही त्याला सोडून देईल, अशा प्रकारे न्यायालयात सादरीकरण केले. ज्यादिवशी ते अपहरण झाले, तेव्हा तो तिथे नव्हताच, अशी भूमिका सरळ सरळ पोलिसांनी घेतली आणि त्याच्या न्यायालयीन सुटकेचा मार्ग मोकळा करून दिला. यावेळी अमृतपाल सिंगने सरळ सरळ अमित शाहंना जाहीर धमकीही दिली. खलिस्तान नाकारणार्‍या इंदिरा गांधींचे जे झाले, तेच अमित शाहंचे होईल, अशा आशयाचे त्याचे भाषण होते.

या घटनाक्रमाला अजूनही काही पदर आहेत. अमृतपाल सिंग ज्या संस्थेचा म्होरक्या म्हणून पुढे आला आहे तिचे नाव आहे ‘वारिस पंजाब दे.’ आता हे स्वत:ला ‘पंजाबचे वारस’ म्हणविणारे लोक काय काय करतात, हे जरा समजावून घेणे आवश्यक आहे. मुळात ही संस्था दिप सिद्धू या नट म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवकाने सुरू केली होती. दिप सिद्धू प्रकाशात आला तो दिल्लीत कृषी कायद्यांच्या निमित्ताने जी हिंसा उसळली होती, त्यावेळी. लाल किल्ल्यावर देशाचा झेंडा उतरवून त्याठिकाणी खलिस्तानी झेंडा फडकविण्यावरून दिप सिद्धूवर गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक अस्मितांचे राजकारण करणारे लोक देशाची एकात्मता व अखंडता याला कशी क्षती पोहोचवतात, याचे हे उदाहरण आहे. ‘वारस पंजाब दे’ ही संघटना पंजाबच्या अस्मितेसाठी दिल्लीशी लढते, असा एक आभास पंजाबी तरुणांमध्ये तयार केला गेला. पंजाबी भाषा, संस्कृती यावर दिल्लीहून हल्ला झाला, तर त्याला उत्तर देण्याचे काम ही संघटना करते, असा त्यांचा दावा. दिप सिद्धूच्या अपघाती मृत्यूनंतर त्याची जी रिकामी जागा होती, ती घेण्यासाठी अमृतपाल सिंग दुबईहून पंजाबमध्ये येऊन पोहोचला. त्याने स्वत:वर सगळे शीख संस्कार करून घेतले व आता तो त्याच आवेषात व अभिनिवेषात सर्वत्र फिरत असतो. या संस्थेच्या माध्यमातून वर उल्लेखलेले कार्य होत, असा दावा ते करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र धमक्या देणे, निरनिराळ्या प्रकरणांत अर्थपूर्ण मध्यस्ती करणे, अपहरण अशा कारवायांत ही मंडळी सहभागी असतात.

तुफान सिंगवर जे गुन्हे दाखल झाले होते, तेही असेच आहेत. तुफान सिंगला पोलीस ठाण्यातून सोडविण्यासाठी आत जाताना अमृतपाल सिंग हातात गुरुग्रंथ साहिबची प्रत घेऊन गेले होते. अमृतपाल सिंग पंजाबच्या मोगा जिल्ह्यातला. हा जिल्हा जर्नेलसिंग भिंद्रनवाले याच्यासाठी ओळखला जातो. अमृतपाल हुबेहूब तसाच दिसण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे त्याला ‘भिंद्रनवाले २.२’ म्हणूनही ओळखले जाते. अशा लोकांना पंजाबी तरुणांत चटकन स्थान मिळते. कॅनडा वगैरे देशातून अशा मंडळींना आर्थिक मदत करण्यासाठी तत्परतेने लोकही पुढे येतात. पंजाबचे माजी पोलीस महासंचालक ज्युलियो रिबेरो यांनी या संबंधात लेख लिहून अमित शाह आणि भाजपने या विषयात राजकारण करू नये, असे पुन्हा पुन्हा सुचविले आहे. वेळ पडल्यास अजित डोवाल यांनीही त्यात पडावे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. खरंतर ज्युलियो रिबेरो हे कर्तबगार अधिकारी. पंजाबमध्ये त्यांनी जे त्यांच्या काळात केले ते वाखाणण्यासारखेच. आता मात्र त्यांना इथे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना कोणताच प्रश्न न विचारता सारे काही केंद्रानेच करावे, असे वाटते. हे सारे घडत असताना पंजाबचे मुख्यमंत्री मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत उद्धव ठाकरे कसे ‘बेस्ट सीएम’ होते याचे प्रशस्तिपत्रक देण्यात व्यस्त होते. समस्या खोटी आहे असे नाही. मात्र, एकदा का द्वेषाचा पडदा डोळ्यावर आला की, खर्‍या समस्येचे आकलनही कसे केले जाते, याचे हे उदाहरण!