---Advertisement---
RSS News : संघ फूट पाडण्याचे नाही तर एकत्रित करण्याचे काम करतो असे मत संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. त्यांनी काँग्रेसने देशाचे विभाजन केले असल्याचा आरोप करत संघाने १०० वर्षांत देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वाचे कोणत्याही प्रकारचे योगदान नसून त्यांच्या पूर्वजांचे योगदान होते. याचप्रमाणे आपल्या पूर्वजांनीही स्वातंत्र्यासाठी लढा दिला. काँग्रेसने देशाचे विभाजन केले हे सत्य असून जे काही शिल्लक होते ते स्वतंत्र म्हणून घोषित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाबाबत १५ ऑगस्ट रोजी भाषण दिले होते. यावर इंद्रेश कुमार म्हणाले की, संघ एकतेची भावना आणतो, संघ एकत्र येण्याचे काम करतो, तो फूट पाडत नाही. १०० वर्षांत भारताच्या विकासात संघाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. लाल किल्ल्यावरून संघाने केलेल्या कामाचे कौतुक करून पंतप्रधान मोदींनी मोठा संदेश दिला आहे.
हिमालयाचे महत्त्व स्पष्ट करतांना इंद्रेश कुमार म्हणाले की, हिमालय केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. हिमालय हा भारताच्या सुरक्षेचा सर्वात मोठा आधार आहे. कधी चीन हिमालयाला धोका देतो, तर कधी पाकिस्तान दहशतवादाच्या मदतीने धमकावतो. कधी पाश्चात्य शक्ती हिमालयाचे सांस्कृतिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करत असतो.
इंद्रेश कुमार म्हणाले की हिमालय परिवार हिमालयाचे रक्षण करण्यासाठी, भारताची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि चीनच्या अतिक्रमणापासून हिमालय मुक्त करण्यासाठी संकल्पाने काम करत आहे. आमचे उद्दिष्ट कैलास मानसरोवर चीनच्या तावडीतून मुक्त करणे आहे. लवकरच आपण तिबेट मुक्त होताना आणि दलाई लामा तिबेटला परतताना पाहू.