मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीत मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर यांच्या साक्षीवर शिंदे गटाची मदार आहे. या मंत्र्यांच्या साक्षी पुढील आठवड्यात नोंदविल्या जाणार असून सुनावणीस वेळ लागत असल्याने विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर हे हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला याचिकांवर नियमित सुनावणी घेणार आहेत.
तत्कालीन मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘ वर्षा ‘ निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी आमदारांना पक्षादेश (व्हीप) योग्यप्रकारे बजावले गेले नाहीत, एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी बेकायदा होती, शिवसेनेचे बहुसंख्य आमदार शिंदेंबरोबर असल्याने ठाकरे यांच्या गटाची बैठक पक्षाची अधिकृत बैठक नव्हती, आमदारांच्या स्वाक्षऱ्या बनावट आहेत, ठाकरे यांना विधिमंडळ गटनेता व प्रतोद निवडीचे अधिकारच नाहीत. शिंदे हे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवडले गेले होते. त्यामुळे त्यांनी बोलाविलेली बैठक हीच पक्षाची अधिकृत बैठक असून त्यात घेतले गेलेले निर्णय कायदेशीर आहेत, आदी मुद्दे शिंदे गटाकडून प्रामुख्याने मांडले जाणार आहेत. शिवसेनेचे काही नेते दुसऱ्या टप्प्यात शिंदेंबरोबर गेले होते. त्यादृष्टीने केसरकर, सामंत व आमदार योगेश कदम यांची साक्ष शिंदे गटाला महत्वाची आहे, तर ठाकरे गटाकडूनही त्यांची कसोशीने उलटतपासणी घेतली जाईल. त्यामुळे या साक्षींना वेळ लागू शकतो.
सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष नार्वेकर यांना निर्णय घेण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत दिली असून साक्षीदारांच्या उलटतपासणीस अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे अधिवेशन काळातही दुपारपासून सुनावणी घेतली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.