ब्रेकिंग न्यूज : पीओकेमध्ये असं काही घडलं ज्यानं पाकिस्तान सरकार बिथरलं

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. पीओकेमधील जनता गेल्या सात दशकांपासून मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. आता त्याचा उद्रेक पहायला मिळतोय. पीओकेमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पाकिस्तानी लष्कर आणि सरकारविरोधात सातत्याने निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी आंदोलक संतप्त पाहायला मिळाले. येथील मुझफ्फराबाद ते मीरपूरपर्यंत आंदोलकांनी रस्ते रोको करत पाकिस्तान सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

पीओके मध्ये महागाई आणि भ्रष्टाचारामुळे जनता हैराण झाली आहे. त्यामुळेच लोक आता रस्त्यावर उतरून आपल्या हक्क मागत आहेत आणि सरकारचा निषेध करत आहेत. दुसरीकडे, पीओकेमध्येही पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार शिगेला पोहोचले आहेत. त्यामुळेच पीओकेमधील रहिवासी स्वातंत्र्याचा नारा देत आहेत. काश्मीरचा महामार्ग खुला करून आम्हाला भारतात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पीओकेमधील आंदोलक पाकिस्तान सरकारकडे करत आहेत.

दरम्यान, लाहोरमध्ये माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या गाडीवर संतप्त जमावाने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. पीओकेमधील लोक शाहबाज शरीफ यांच्या गाडीसमोर पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देत होते. यावेळी शाहबाज शरीफ सुद्धा शांतपणे पाहत राहिले. शाहबाज शरीफ एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाहोरला पोहोचले होते, त्यावेळी त्यांच्या गाडीवर संतप्त नागरिकांनी हल्ला केला.