कट्टा बाळगून गावात दहशत निर्माण केली, अखेर आवळल्या मुसक्या

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे तरुण गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करीत मंगळवारी रात्री उशिरा तरुणाला अटक केली. उदय राजू उजलेकर (22, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, वरणगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
वरणगाव शहरातील उदय उजलेकर हा तरुण वरणगाव शहरात गावठी पिस्टलच्या बळावर दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना कळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. सहा. फौजदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार दीपक शांताराम पाटील, महेश आत्माराम महाजन, किरण मोहन धनगर, प्रमोद अरुण लाडवंजारी, रवींद्र रमेश पाटील, मुरलीधर सखाराम बारी आदींच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी वरणगाव शहरातील हॉटेल पारसजवळून संशयीताला ताब्यात घेतले.

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त
संशयीताच्या अंगझडतीत गावठी पिस्टल तसेच दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेचे प्रमोद लाडवंजारी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासकामी आरोपीला वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तपास उपनिरीक्षक परशूराम दळवी करीत आहेत.